Skip to main content

मैत्री फेसबुक शाळेतील

          दोन दिवस आपल्या फ्रेंडलिस्ट बद्दल लिहीलेले दिसतेय, सगळीच गंमतीदार निरिक्षण. ते वाचून मला एका जपानी हायकूचे मराठी चारोळी रुपांतर आठवले.
       आपण दोघे गप्पा मारु
       ये माझ्या जवळी
       तु ही वेडा, मी ही वेडा
       ही वेड्यांची शाळा.     
        
         मला तर ही वेड्यांची शाळाच वाटते, ना.घ.देशपांडे यांना एका कवितेत," सकाळचा उगवतीचा सूर्य लालबुंद बर्फाच्या थंडगार गोळ्यासारखा वाटतो, माणसांकडे बघता बघता तो तप्त गोळा होवून तो माथ्यावर येतो."
          "त्यांना ते बघून शाळात जाणारी मुलं डोळ्यासमोर येतात, शाळेत जाणारी मुलं अज्ञाधारक,शांत, समजूतदार असतात पण शाळेत पोचली की बरोबरीच्या मुलांसोबत वांडपणा करतात".
            तसेच इथेही, या वर्गात येताना बहुतेक सर्वच जण समंजस, मनमिळाऊ असतात पण इथे आल्यावर वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये विभागली जातात.
           त्या लहान मुलांसारखीच नावडत्या मुलांची चकण्या, दंताड्या,पेंग्या,ढोल्या अशा नावांनी टिंगलटवाळी केली जाते. एकमेकांच्या कानाशी लागले जाते. जरा जास्त बिनधास्त, तगड्या मित्राकडे कंम्प्लेंट केली जाते. नाहीतर घोळक्याने एकट्याला गाठून घोळात घेतले जाते.
           कोळशात पडलेला हिरा काळवंडला तरी
 मौल्यवान राहतो तसेच कधीतरी माणूस योग्य वेळी खोट्या मुखवट्यातून बाहेर पडतो आणि संध्याकाळच्या सूर्यासारखाच सौम्य होता होता अस्तंगत होवून जातो.
           फ्रेंडलिस्ट ही अशीच असते,वेड्याच्या शाळेसारखी, तुमची, माझी, आपली सर्वांचीच.

ता.क. मुळ हायकू किंवा ना.घं. ची मुळ कविता शोधण्याचा प्रयत्न करु नये,तशीही ती सापडणार नाहीच.

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४