आठवणीतले माणिक मोती
गळून गेले, तुझेच होते.
डोळ्यामधले स्वप्न सुनहरे
काजळ डोही,तुझेच होते.
रंगबिरंगी दिवस तेही
फुलपाखरी तुझे होते,
हातामध्ये शिल्लक उरले
रंग सगळे तुझेच होते.
स्निग्ध उबेचे स्पर्श सावळे
रेंगाळणारे तुझेच होते.
उंबऱ्यावरला पायरव ते
चाहूल भरले तुझेच होते.
गंध वेगळे हवेत भरले
वाऱ्यावरती तुझेच होते.
आठवणीतच उरले सारे
विरुन गेले,तुझेच होते.
पाठी मागे शिल्लक आहे
मी पण माझे,तुझेच होते.
संपून गेले तरी ही सारे
नाव त्यावरी तुझेच होते.
Comments
Post a Comment