केव्हा तरी एकदा परत भेटूया
एकमेकांच्या आठवणी परत करुया.
नकोच आता घरावरले पोकळ वासे
खोलवर घातलेला पाया तोडून टाकूया.
फुललेले वसंत झेलले ज्या झाडाखाली
ते झाडच आता एकदा उखडून फेकूया.
बघितली होती किती स्वप्न चांदण्या राती
ते चांदणेच आता मनातून खुडून टाकूया.
चाललो ज्या पायवाटे वरुन आनंदाने
ती पायवाट आता विसरुन जावूया.
नसते सुटत गणित आयुष्याचे प्रतिक वेळी
मांडलेला जमा खर्च पुसून टाकूया.
असतात आवडणारे रंग प्रत्येकाचे वेगळे
एकमेकांत मिसळण्या आधीच धुवून टाकूया.
लिहीली प्रत्येक कविता तुझ्या प्रेमाखातर
ती वही एकदा तुझ्या साक्षीने जाळून टाकूया.
Comments
Post a Comment