Skip to main content

संभ्रमात हरवलेला रस्ता

 चालावे की उभे रहावे हा एकच सवाल आहे.
 ह्या संभ्रमाच्या वाटेवर तापलेल्या हवेवर हेलकावत तुटलेले पान होऊन भिरभिरावे निःसंगपणे की टाकून द्यावे अंग तप्त भुमीवर ?

आणि करावा शेवट अस्तित्वाचा मनातल्या...?
माझा तुझा ह्याचा अन त्याचाही.
एकाकीपणाचे हलाहल भरुन घ्यावे उरामध्ये…
की नंतर असणाऱ्या जिवंतपणाला नसावा स्पर्श अमृताचा कधीही..


पण मग..
पण मग त्या

त्या अस्तित्वाला ही ग्रहण लागलं तर….? तर…तर…
इथेच मेख आहे.नव्या लोकांच्या अनोळखी जंगालात प्रवेश करण्याचा,
धीर होत नाही म्हणुन आम्ही जपत रहतो जुने
आपलेपण..
सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने
उपेक्षांचे प्रहार…
अस्तित्वाच्या गाभा-यात असणा-या मी पणाचा अंत..
आणि अखेर शरण जातो खालच्या मानेन भुतकाळाच्या दाराशी.

विधात्या.. तु इतका कठोर का झालास?
एका बाजुला आम्ही ज्यांना प्रेम दिले ते आम्हाला विसरतात आणि दुस-या बाजुला ज्याने आम्हाला प्रेम दिले तो तु हीआम्हाला विसरतोस.
पण मग विस्कटलेल्या आठवणींचे
हे सापळे घेऊन हे करुणाकरा…
आम्ही कोणाच्या दारावर डोक आदळायच? कोणाच्या दारा ?
कोणाच्या ? कोणाच्या???

मामा वरेरकारांसारख्या प्रख्यात नाटककार,जगन्मित्र,कोटीभास्कर , खासदार, ज्यांनी अजरामर नाटके रंगभूमीला दिली, शरच्चंद्रांच्या सर्व कादंबऱ्यांचा मराठीत अनुवाद केला. तमसगीरांसारख्या उपक्षितांना तंबू आणि यात्रेतून मुख्य धारेमध्ये स्थान मिळवून दिले. अशा मामांना आपली जाणीवपूर्वक उपेक्षा केली जातेय अशा संशयाने हवालदिल करुन टाकले,तिथे सामान्यांची काय कथा !
पण मग अशा वेळी आठवतो तो साहित्यिक रवींद्र पिंगे यांचे वडील रामभाऊ पिंगे यांनी आपल्या मुलाला केलेले मार्गदर्शन.

" दुसऱ्याला पारितोषिके मिळतात आणि तुला नाही याचे वाईट वाटून घेवू नको. त्यांच्याकडे जे आहे ते तुझ्याकडे नाही,तुझ्याकडे आहे ते त्यांच्याकडे नाही. प्रत्येकाची शक्तिस्थाने वेगवेगळी असतात. त्यांना पारितोषिक मिळाले म्हणजे ते जगावेगळे ठरत नाहीत. ईश्वराची कृपादृष्टी असणे महत्वाची, ती तुझ्यावर आहे,तू आनंदाने जे लिहीतोयस ते लोक तेवढ्याच आनंदाने वाचतायत,आणखीन काय हवे ?"

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४