Skip to main content

Posts

Showing posts from 2025

त्रिदल

ग्रीष्म वनातील...मनातील.   (१) तापल्या भूमीच्या कडेवर ऊन ग्रीष्माचे थरथरते, बघून खेळ ढगांचा गालात हळूच हसते. तापल्या तळ्याकाठी निवांत बसतो काळ, पक्षांच्या पंखाखाली सावली शोधते आभाळ. कोकीळेच्या तालावर आम्रवृक्ष करतो नर्तन,  मृगजळाच्या मागून संध्याछायेचे आगमन. (२) आता होते असे कधी सापडले मुठीत काही क्षण, आणि उसवते ठायी ठायी अबोध अजाण माझे मन. किती जपावी लागते आता नात्यामधली आपल्या वीण, चुकलेल्या एका क्षणाने फाटते तुटते माझे मन. ओंजळा राहते पुरी रिकामी किती टाळावे लागते रण, सुगंधाच्या क्षणाक्षणाला आतूर उत्सुक माझे मन. कधी टळेल हा ग्रीष्म कधी फुलेल पुन्हा बन, तुझ्या प्रीतीच्या वाटेवर तृषार्त सावळे माझे मन. (३)  कसे जपावे अंतरी पिकल्या पानाचे भान, कसे राखावे अंतर मनी भृंगाचे गुंजन. देवा असे का मांडतो ऋतु भरले हे सण, चातकासम आतूर रुपगंधीत माझे मन. कसे थांबवू ओघळणं वेळेच्या ओंजळीतून, कसे सोसावे मौन उसळते अंतरातून. देवा तुझ्या इच्छेने उलगडती सारे क्षण, जपता जपता उमजले हरवणेही एक जतन. कसे मोजावे श्वास ऋतू बदलत्या क्षणी, कसे सोसावे तुटणे स्वप्न जपलेले मनी. शिकवीत जातो काळ सोडून देण...

ग्रीष्म मनातील

कसे जपावे अंतरी पिकल्या पानाचे भान, कसे राखावे अंतर मनी भृंगाचे गुंजन. देवा असे का मांडतो ऋतु भरले हे सण, चातकासम आतूर रुपगंधीत माझे मन. कसे थांबवू ओघळणं वेळेच्या ओंजळीतून, कसे सोसावे मौन उसळते अंतरातून. देवा तुझ्या इच्छेने उलगडती सारे क्षण, जपता जपता उमजले हरवणेही एक जतन. कसे मोजावे श्वास ऋतू बदलत्या क्षणी, कसे सोसावे तुटणे स्वप्न जपलेले मनी. शिकवीत जातो काळ सोडून देण्याचे बळ, पिकले पान गळता वृक्ष होतो रे सबळ. ----अभय बापट २५/१२/२०२५

मन

आता होते असे कधी सापडले मुठीत काही क्षण, आणि उसवते ठायी ठायी अबोध अजाण माझे मन. किती जपावी लागते आता नात्यामधली आपल्या वीण, चुकलेल्या एका क्षणाने फाटते तुटते माझे मन. ओंजळा राहते पुरी रिकामी किती टाळावे लागते रण, सुगंधाच्या क्षणाक्षणाला आतूर उत्सुक माझे मन. कधी टळेल हा ग्रीष्म कधी फुलेल पुन्हा बन, तुझ्या प्रीतीच्या वाटेवर तृषार्त सावळे माझे मन. ----अभय बापट २४/१२/२०२५

ग्रीष्म

तापल्या भूमीच्या कडेवर ग्रीष्माचे ऊन थरथरते, बघून खेळ ढगांचा गालात हळूच हसते. तापल्या तळ्याकाठी निवांत बसतो काळ, पक्षांच्या पंखाखाली सावली शोधते आभाळ. कोकीळेच्या तालावर आम्रवृक्ष करतो नर्तन,  मृगजळाच्या मागून संध्याछायेचे आगमन. ----अभय बापट

ऋतू चक्र

ऋतू चक्र

वाऱ्यावर विहरत आले कोकीळेचे नाजूक सूर वसंताच्या स्वागताला चैत्र वैशाख आतूर. जेष्ठ आषाढ शोधती ग्रीष्माच्या पाऊलखुणा  तापल्या भूमीला लागे वर्षाच्या ऋतूच्या वेणा. श्रावण भाद्रपद येती गाणे भक्तीचे गात श्रावण जागवत येतो शरदाचे चांदणे मनात. शरदाच्या स्वच्छ ऊन्हाला आजीच्या गोधडीचे मन पानगळीच्या आधी साठवतो निसर्ग बीजापोटी धन. उदासवाणा शिशीर करी पानाफुलांचा संहार पानगळ म्हणावी ही की वृक्ष उतरती श्रृंगार. -----अभय बापट.

शेल काव्य-सुटला गारवा

*शेल काव्य चारोळी* *विषय-सुटला गारवा* सुटला गारवा गारवा गुलाबी, गुलाबी सौंदर्या नशा ही शराबी. ----अभय बापट चाहूल घेवून आली आली मेघांची वरात, सुटला गारवा अन्  अन् समुद्र भरात. ---अभय बापट घेवून श्रावण आला आला निसर्ग भरात, सुटला गारवा तरी आला आनंद घरात. --- अभय बापट

बैठकीची लावणी

चंद्र डोईवर आला, जीव होई अधीर कधी येणार सखया, अश्रूंचा सुटला धीर. रात गेली झोप उडाली, धूसर झाली पहाट स्वागताला तुझ्या राया शृंगारली पायवाट मनात पेटली ओढ, उर व्याकूळ खरोखर तुझ्याविना वाटे मला दाही दिशा अधीर. काळजात जखमा जाग्या, श्वास बोलका झाला नाव जपून धरताना माझा श्वासही रेंगाळला तुझ्या नावाचा आठवांनी श्वास सुगंधी अमीर कधी येणार सखया अश्रूंचा सुटला धीर. नाही सोसवत आता आले तुम्हा मी शरण डोळ्यांतून ओघळती रे नीराचे पिकले धन. भरल्या मनामध्ये नाचे मनमोर मत्त मयूर कधी येणार रे सखया अश्रूंचा सुटला धीर. सोळा शृंगार साज, तुझ्याचसाठी मी केला काजळ, हळद कुंकवी, रांगोळी अंगणी मांडला. ग्रीष्मानीही मांडला एकाकी जीवनी कहर कधी येणार सखया अश्रूंचा सुटला धीर. घेतले निरांजन हाती, हाती हिरवे कंकण तुमच्या मनात उरावे हेच मला रे भूषण  मनामध्ये माजतोय भयभिषण काहूर कधी येणार सखया अश्रूंचा सुटला धीर. चंद्र डोईवर आला जीव होई अधीर कधी येणार सखया अश्रूंचा सुटला धीर. ----- अभय बापट ०६/१२/२०२५

एकाकी राधा

कुठे गेला कान्हा , वाट थांबली जीवाशी युमेनेच्या वाटेवर थरथर दाटे उराशी. नूपुर थांबले माझे, थांबली पावले सारी, राधेवीना एकाकी कृष्णा तुझी रे बासरी योगेश्वर तू जगाचा आले शरण तुला आज आठवणीत अजून तुझा मोरपीसांचा साज. वेळूबनामधून आज वारा वाहे रुणझुण तुझ्यावीन त्यांच्या देही वारा फुंकतो प्राण. आकाशा सारखे तुझे रुप मन भेटण्या अधीर आकाशाच्या गाभ्यातून कृष्ण सगुण साकार. -----अभय बापट ०१/१२/२०२५

वेदना

कृष्णा,तुझ्या लक्षात तरी आले का रे, जगाला गीतेतून कर्मयोगाची दिक्षा देणारा तू, तू मला या राधेला मात्र निवृत्तीचे वरदान दिले. कृष्णा, शक्य तरी होते का तुझ्या रंगात रंगलेली ही राधा दुसऱ्या कोणत्याही रंगात एकरुप होऊ शकेल. कृष्णा, आकाशाला गवसणी घालण्याच्या नादात या राधेच्या मनाच्या अथांग डोहातील वेदना तुला जाणवलीच नाही का ? अरे समर्पण हे माझे प्राक्तन असेल तर ते शतकानुशतके स्त्रीयांच्याच कपाळी का गोंदवून ठेवलेस. कृष्णा,तू युगायुगांना परत येण्याचे वचन दिलेस ही राधा मात्र तुझ्या वचनापासून कोरडीच राहीली, युगे सरली पण ही राधा फक्त वेदनेची, समर्पणाची ओळख बनून राहीली. कृष्णा,तुझ्या बासरीचे सूर अजूनही यमुनेच्या तीरावरुन आकाशाला गवसणी घालतात, पण ते आता या राधेसाठी कधीच नसतात. कृष्णा, तू तुझ्या गीतेतून जगाला जीवनाचे सार शिकवलेस, पण तूच जिचे जीवन आहेस त्या राधाला कोण समजवणार ? कोण कृष्णा, कोण ? ----- अभय बापट ०१/१२/२०२५

शब्दसखा कृष्ण

सारी शब्दांची निळाई  बासरी गुंजते कानात किती भुलावे भुलावे राधा जागते मनात. किती लोभसवाणे गीत किती सुरेल सुस्वर मना मनाला लोभवतो नटखट गोकुळचा चोर. शब्द शब्द विरंगुळा  शब्द शब्द आधार जणू आकाशाच्या गाभ्यातून कृष्ण सगुण साकार. ----अभय बापट २२/११/२०२५

काय उपयोग

जसे चांदणे उन्हात आणि कल्पवृक्ष वनात काय उपयोग यांचा जसे अमृत कानात. जशी सावली फुफाट्यात आणि मृगजळ रणात काय उपयोग याचा जशी निराशा मनात. जसे स्वप्न मनात स्पर्धा आपुल्यात काय उपयोग यांचा जसा द्वेष नात्यात. जशी माऊली वृद्धधामात आणि श्वान माजघरात  काय उपयोग याचा जसा सुविचार पुस्तकात. ------अभय बापट २८/११/२०२५

लाघवी निळाई

जेव्हा वाटते एकाकी तेव्हा जावे सागराशी, ओढून निळे लाघव एकरुप व्हावे त्याच्याशी. वर निळे आभाळ खाली निळा समिंदर, हळूच सोडून द्यावा मनावरचा सारा भार. लहरींच्या तालाशी भिजू द्यावे अंतरंग, काठावर येतायेता निथळू द्यावे दु:खरंग. वाऱ्याच्या स्पर्शातून जन्मेल नवी उमेद, सागराच्या विशालात अर्पावे सारे खेद. थेंबथेंब शांतता ओघळू द्यावी मनात, आणि मग परतावे  नव्या उमेदीने रणात. ----अभय बापट १९/११/२०२५

नाम महिमा

देवा तुझ्या नामाचा रे, सुगंध असा दरवळावा आणि माझ्या श्वासालाही, कस्तुरीचा भाव यावा डोईवरच्या ऊन्हालाही माया सावलीची यावी हातावरच्या घावाचीही फुले प्राजक्ताची व्हावी देवा तुझ्या नामाचा टिळा ललाटी लागावा आणि माझ्या श्वासालाही, कस्तुरीचा भाव यावा. देवा तुझ्या लेकरांचे शब्द मनी रुजवावे  माझ्या मनामध्ये भाव तुकयाचे जागावे ज्ञानाशाच्या ओवीने मार्ग जगण्याचा दाखवावा आणि माझ्या श्वासालाही, कस्तुरीचा भाव यावा. देवा नाथांच्या भक्तीचे बाळकडू पाजावे रामदासांच्या शक्तीचे मर्म मला आकळावे मायेच्या ममतेने हात माझा हाती घ्यावा आणी माझ्या श्वासालाही, कस्तुरीचा भाव यावा. देवा मनीच्या लालसेला समाधानाची पडो मीठी कैवल्याच्या चांदण्याशी घडून याव्या भेटीगाठी तुझ्या माझ्यातला अंतराय दूर दूर सरावा आणी माझ्या श्वासालाही, कस्तुरीचा भाव यावा. विठू नामाच्या गजराचा ध्यास असा जडावा माझ्या कणाकणातून नाद चिपळीचा घुमावा. देवा तुझ्या नामाचा रे, सुगंध असा दरवळावा आणी माझ्या श्वासालाही कस्तुरीचा भाव यावा देवा तुझ्या नामाचा रे, सुगंध असा दरवळावा आणी माझ्या श्वासालाही, कस्तुरीचा भाव यावा ----अभय बापट ११/११/२०२५

आई

कसा फुटतो पाझर हृदयास माझ्या बाई येता बाळाची आठवण तळमळतेच आई. बोल अमृतात भिजून गीत होऊन येतात आशिर्वादासाठी डोळ्यात निरांजन तेवतात. कशी उतराई होऊ मला केलेस तू आई येता बाळाची आठवण तळमळतेच आई. तुझ्या नाजूक पावलांना होईल आकाश ठेंगणे  तुझ्या सद्गुणी वागण्याला लाभो मार्दव्याचे लेणे घेशील तू उंच भरारी आभाळ कवेमध्ये घेई येता बाळाची आठवण तळमळतेच आई. तुझ्या राजस रुपाला लाभो संस्काराचे बळ माझ्या ममता शिस्तीचे मिळो तुला गोड फळ येता ग्रीष्माची आठवण सय सावलीची येई येता बाळाची आठवण तळमळतेच आई. ------अभय बापट २८/१०/२०२५

कोर बीजेची आकाशी

सुंदर शब्दांचे तोरण लागले आपल्या दाराशी जणू सजते डोईवर कोर बीजेची आकाशी. प्राजक्ताच्या पावलांनी सुख अंगणात येते, सुंदर साजीऱ्या शब्दांनी मनी रोमांच उठते. शब्द शब्द उमाळ्याचे आपले करती रंजन जणू आईच्या हास्यातून उब देते निरांजन. सुख सावलीची आहे तुमच्या शब्दांना झालर, जणू तुमच्या बोटांमध्ये  आहे शारदेचा वावर. अमृताचा अनुभव यावा पुन्हा ओठाशी शब्दा शब्दातून उगवावी कोर बीजेची आकाशी. जरा ओजस्वी तेजस्वी  झळाळी शब्दांना लाभावी आणी तुमच्या कवनांनी जगण्याला दिशा द्यावी. ----- अभय बापट २७/१०/२०२५

वेदनेच्या नोंदी

प्रहराच्या अक्षरनोंदी भावनांचा वज्रलेप  वाहू कशी फुले ती अश्रूंत ओवलेली. शब्दांची पाऊलवाट  वृत्तांचे अलंकार गुंजेल कसा विराणी कंठात गोठलेली. स्वप्नांची कातरवेळ  अश्रूंची सागरधार मांडू कशी दु:ख माझी उरात साठलेली. ----अभय बापट १५/१०/२०२५

अंतर

किती अंतर चालल्यानंतर येतो सुगंध नात्याला  किती अंतर चालल्यानंतर भेटतो आपण स्वतःला. समजून घेतले कोणाला तरच येतात व्यथा कवेत किती अंतर चालल्यानंतर जाणतो आपण बापाला. चुकांमधून शिकत शिकत घडत जातो आपण किती चुका केल्यानंतर जाणतो आपण सत्याला. दूर राहून प्रेम वाढते बोल अनुभवी जगाचे किती दूर गेल्यानंतर स्मरतो आपण मातीला. सर्वांभुती परमेश्वर मानतो आपण गीतेला किती सोबत चालल्यानंतर विसरतो आपण जातीला. ---अभय बापट. ०६/०९/२०२५

खबरदारी

खुप थोड लिहिण्याआधी खुप काही खोडावे लागते वयात आलेल्या लेखणीलाही थोडे जपावे लागते. भावनाही झाल्या बेभान आता समाजासारख्या अश्रूंतून उतरण्याआधी त्यांना समजावावे लागते. रक्त आणि अश्रू ही नाही करत कोणाला हळवे हळवे होण्याआधी आजूबाजूला बघावे लागते. लोकं काय म्हणतील याची काळजी करत लोकांमधले एक होवून दुसऱ्यांना बोलावे लागते. आधारासाठी पुढे आलेला हात हाती घेण्याआधी पाठीमागे लावलेल्या झेंड्याला तपासावे लागते. माणसे झाली इथली माणुसकीला पारखी आता प्राण्यांमधल्या माणुसकीचे उदाहरण द्यावे लागते. -----अभय बापट

मैत्री

मैत्री म्हणजे ग्रीष्मातला गारवा, मैत्री म्हणजे शुष्क जीवनातला श्रावण सरवा. मैत्री म्हणजे  आयुष्यातील सुरेल गाणे, मैत्री म्हणजे  आपुलकीचे नाणे. मैत्री म्हणजे  अपुर्णतेतील पुर्णता मैत्री म्हणजे जीवनातील सुदृढता. मैत्री म्हणजे तू दिसत नसूनही असणे मैत्री म्हणजे अविरत आनंदाचा झरा वाहणे. मैत्री म्हणजे अंधारात उजेडाचे लेणे, मैत्री म्हणजे सुख, समाधान, आनंदाचे बरसणे. मैत्री म्हणजे रुसणे,फुगणे, रागावणे, मैत्री म्हणजे समजावणे, समजणे, सावरुन घेणे. --- अभय बापट ०३/०८/२०२३

स्वगत बोकोबांचे

खावं काही पळवून पातेलीतलं की रहावं उपाशी हा एकच सवाल आहे. ह्या घराच्या वळचणीला उरलेला पोळीचा तुकडा खावून जगाव बेशरम लाचार आनंदान ? की थैमान घालावं म्याव म्याव करुन स्वत:च्या हक्कासाठी  आणि करावा शेवट या लादलेल्या उपासाचा. माझ्या तुझ्या ह्याच्या अन त्याच्याही. पोटात चुकचुकणाऱ्या उंदाराने भुकेला असा डंख मारावा… की नंतर मिळणाऱ्या सुखनिद्रेला नसावा किनारा कधीही.. पण मग.. पण मग त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडु लागलं तर….? गळ्यात बांधलेल्या घंटेचे तर…तर… इथेच मेख आहे.भुकेच्या भयंकर डोहात अपेक्षेने तोंड घालण्याचा  धीर होत नाही म्हणुन आम्ही सहन करतो रात्रीची निरव शांतता आसमंतात हात पसरुन काळोखाला आपल्या कवेत घेण्याची. सहन करतो लबाड साधूसारखे डोळे मिटून वाट बघण्याची तपश्चर्या आमच्या अमाप उत्साहाला कुंपण पडत असले तरी... अखेर तोंडाचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेन आमच्याच दादाच्या पायाशी. विधात्या.. तु इतका कठोर का झालास? एका बाजुला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुस-या बाजुला ज्याने आम्हाला आधार दिला ते ही आम्हाला वाट पहायला लावतात छोट्या ताईच्या शाळेतून येण्याची...

कधीतरी वाटते

कधीतरी वाटते  ओसाड तळ्याकाठी  उतरावा एक पक्षी, त्याच्या नाचऱ्या पावलांनी मातीत उमटावी नक्षी. कधीतरी वाटते  तापल्या भुईवर हलकीशी यावी सर, निष्पर्ण मातीतून फुलून उठावा बहर. कधीतरी वाटते  मोकळ्या अंगणात रासलीला रंगून जावी सावळ्या कृष्णासाठी राधाही धावून यावी. कधीतरी वाटते  धारानृत्य रंगावे आभाळाच्या पटावर धरेलाही फुटून पान्हा अमृताने यावे वर. कधीतरी वाटते  अभ्र सारे सरावे प्रगटावा अनाहत नाद चैतन्याच्या चांद राती अज्ञातातून यावी साद. -----अभय बापट २०/०५/२०२५

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

भुल

नजर,स्मित आणि तुझ्या अदांवर सांग मी किती लिहावे तू भेटल्यानंतर. अमृतानी भरुन जाते खळी तुझी ती सांग मी किती भूलावे तू हसल्यानंतर. तुझी ओढ,तुझी आर्जवे,प्रीती तुझी ती सांग मी कसे जगावे तू रुसल्यानंतर. तुझ्या ओठांवर, तुझ्या बटांवर, सांग मी किती लिहावे तू दिसल्यानंतर. नाक चाफेकळी आणि मोत्यांची झळाळी सांग मी कसे विसरावे तू गेल्यानंतर. ------ अभय बापट

गंध आठवणींचा

तू श्वास होऊन ये आठवणींच्या सोबतीला गंध तुझा मोगऱ्याचा मनामध्ये जपलेला. उब तू घेवून ये शब्दांमधली भावनांची गारवा तू दिलेला डोईवर आहे थांबलेला ही रात्र मंतरलेली दे हातामध्ये हात पुन्हा तुझ्यासाठी स्वप्नांचा खेळ हा मांडलेला. तुझ्या स्मितहास्य झरझर पावसासारखे मनामध्ये नव्याने आशेचा अंकुर रुजलेला. तुझ्या नजरेतील स्निग्धता आहे अजून जवळ कालच्यासारखा आजही तो क्षण हृदयात जपलेला. तुझ्या शिवाय अपूर्ण सारं, तुझ्यात आहे पूर्णत्व म्हणूनच कोणी अजूनही त्या वळणार थांबलेला. ---- अभय बापट ०२/०५/२०२५

एकशे अकरावी दुरुस्ती--ओळख पुस्तकांची

एकशे अकरावी दुरुस्ती... सुरेश द्वादशीवार या एका गांधीवादी पत्रकाराने लिहीलेली एक कादंबरी.  काही मुठभर लोकांच्या अमर्याद सत्तेच्या, अमर्याद अधिकाराच्या लालसेपोटी एकशे अकराव्या घटना दुरुस्तीचा घाट घातला जातो. त्याला लोकांचा पाठिंबा मिळावा म्हणून लोकांना असुरक्षित वाटावे अशा अफवा पसरवल्या जातात, खून, हत्या, अपघात घडवले जातात. एक लष्करी वैमानिक, देशभरातील माहितीचे संकलन, वर्गीकरण, विश्लेषण करणाऱ्या सरकारी खात्यातील एक अधिकारी, एक हुशार, लोकप्रिय पत्रकार यांच्या लक्षात नेहमीपेक्षा वेगळ्या घडणाऱ्या गोष्टी लक्षात येतात. ती पत्रकार या सर्व गोष्टींची माहीती विवेकी,देशभक्त, लोकशाही प्रेमी गृहराज्यमंत्र्यांना देते. गृहराज्यमंत्री हे सर्व सरन्यायाधीशांना सांगतात, सरन्यायाधीश सर्व घटनांची माहीती राष्ट्रपतींना देतात आणि विधेयक सरकरकडे परत विचारासाठी पाठवण्याची विनंती करतात आणि..... मॉर्निंग वॉक साठी निघालेल्या सरन्यायाधीशांचा भिषण अपघात होतो. मृत्यूपूर्व जबाबात न्यायाधीश सुरवातीलाच म्हणतात," माझा मृत्यू अपघाती नाही तर एकशे अकराव्या घटना दुरुस्तीचा मी पहिला बळी आहे." गृहराज्यमंत्र्यांचा उ...