धुळवड अर्थात धुलिवंदन बहिणाबाई चौधरींच्या एका कवितेच्या ओळी आहेत--- मन जहरी जहरी, त्याचं न्यारं रे तंतर। अरे इंचू, साप बरा, त्याले उतारे मंतर।। विंचू, साप यांचे विष मंत्र,औषधोपचार याने उतरता येते पण मनातील राग,द्वेषबुद्धी यावर कोणताही उपाय चालत नाही. भारतीय संस्कृतीवर कायम एक आरोप केला जातो तो म्हणजे ही संस्कृती भावनांचे दमन करायला लावते पण होळी आणि धुळीवंदन हे याला चोख उत्तर आहे. होळीच्या दिवशी मनातील राग-द्वेष, किल्मिष होळी पेटवताना व्यक्त करुन त्यांना जाळून,नष्ट करुन मोकळे व्हायचे, आधुनिक मानसशास्त्र हे पण हेच सांगते," भावना मनात दाबून टाकून कुढत राहण्यापेक्षा, त्या व्यक्त करुन त्यांचे ओझे मनावरुन उतरवून टाकणे हा मनाच्या स्वास्थासाठी चांगले असते" हि संधी होळीच्या रुपाने आपली संस्कृती आपल्याला देते. होळीच्या वेळेला निरुपयोगी पालापाचोळा,लाकूड फाटा, त्याच बरोबर मनातील अडगळही जाळून टाकायची. दुसऱ्या धुळीवंदनाच्या दिवशी ती राख अंगाला फासून त्या सगळ्या अडगळींपासून निवृत्त व्हायचे, अनेक प्रकारच्या झाडांची ही राख औषधी असते,त्वचारोगांवर त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. त्याच होळीच्...