Skip to main content

Posts

Showing posts from 2022

रिता

मोकळ्या आपल्या हाताने चाफा आभाळा बोलवतो, रित्या झालेल्या खोडाला कोण कवेमध्ये घेतो. किती खोदले तरीही नाही सापडत धारा रित्या झालेल्या विहिरीला कसे फुटेल हो झरा. रित्या झाल्या सरितेला कसा फुटावा हो पान्हा, रित्या कोरड्या धरित्रीचा कसा जगावा हो तान्हा. रित्या आठवणींची मोळी कोणी कशाला बांधवी, नववर्षाच्या यज्ञात एकेक समिधा अर्पावी. ----- अभय बापट ३०/१२/२०२२

कोडं

ओठ जेव्हा ओठांना भेटतात तेव्हा काय होते आयुष्याची फुले उमलतात तेव्हा काय होते. सागराची निळाई दुरवरुन भुलवत असते अथांगात स्वप्न सामावतात तेव्हा काय होते. अंतरंगातला ओलावा नव्याला जन्म देतो देहावरती ऋतू पालटतात तेव्हा काय होते. शब्दांशिवायही गुज उमटते अंतरंगात दोन जीव एकरुप होतात तेव्हा काय होते. सगळेच भाव कुठे व्यक्त करता येतात गात्रामधून कविता स्फुरतात तेव्हा काय होते. ------ अभय बापट २९/१२/२०२२

सावली

एक तरी हात असू द्यावा हाती आनंदाच्या गाठी रेषांमध्ये. एक तरी सावली असू द्यावी माथी सुखाचे सोबती पानोपानी. एक तरी तारा असो द्यावा डोई अथांगाची जाण जागवित. २२/१२/२०२२

झाडासम जगलो

झाडासम जगलो मी  फुललो कधीच नाही, बदलले ऋतू कितीही  बहरलो कधीच नाही. आकाश झुंबराचे  आणि आरसा बिलोरी, निरखून बघण्यास  झुकलो कधीच नाही. नक्षी पाखरांनी  नभात मांडलेली, बघितली मी तरीही  झुललो कधीच नाही. आभाळ पांघरोनी  मी घेतले सदाचे, होते समीप सारे  रुजलो कधीच नाही. त्या माणसांनी कधीचे  घातले हजारो घाव, होतो एकटा जरीही  तुटलो कधीच नाही. गेले विरुन सारे  आसमंतातील तारे, स्थानावरून तरीही  ढळलो कधीच नाही. येतील असेच वारे  आणि वादळे कधीही, झेलूनही वार सारे  रडलो कधीच नाही. ----अभय बापट १४/१२/२०२२
दु:खालाही चिमटीमध्ये धरता आले पाहीजे आरशालाही बेफिकीरीने टाळता आले पाहिजे असते चांदणे आपल्या मनामध्ये जपलेले सुर्यालाही थांब आता सांगता आले पाहिजे. ---अभय बापट १२/२२/२०२२

तुझे शब्द

कधी फुलांचा रंग कधी ताऱ्याचे तेज, कधी गालावरचे गुलाब तुझ्या शब्दी. कधी कस्तुरीचा गंध कधी वारा बेबंध, कधी वादळी प्रपात तुझ्या शब्दी कधी माऊलीचे प्रेम कधी सावलीचा आधार, कधी सत्कार्माचा विचार तुझ्या शब्दी. कधी तेजाची आरास कधी संस्कारांचा ध्यास कधी माणुसकीवर विश्वास तुझ्या शब्दी. कधी गहन विचार कधी खळखळणारी धार कधी आयुष्याचे सार तुझ्या शब्दी. ------- अभय बापट ०४/१२/२०२२

बदल

आता गवत नुसतेच हिरवे दिसते आकाश नुसतेच दिसते निळे सोनेरी कवडशाच्या अंगावरती नसतात प्राजक्ताची फुले. ढग नुसतेच काळेभोरं त्यावर सदा बिजलीची कोर ऊन पावसाच्या खेळांमध्ये कुठे नाचतो इंद्रधनुष्यी मोर. कुठे दिसतात झाडांवरती फुलपाखरांचे बिलोरी पंख, मोबाईलमध्ये लपलेले डसतास विंचवाचे डंख. आता पुस्तकाची पानं  नुसतीच फरफरतात, स्वरावीना गाणी  कागदावरतीच सुकून जातात. निसर्गही एकटा एकटा  फुलतो आणि सुकून जातो, आपल्या कोशामध्ये शिरुन  नदीचे गाणे गातो. नदी एकटीच उफाळून  सागराकडे धावत जाते, सर्व काही घडत असताना  आजकाल कोण पहाते. प्रत्येकजण आपल्यामध्ये  आपल्यासाठी जगत राहतो, स्वत:च्या स्तुतीत मग्न स्वत:लाच फुलं वाहतो.

आठवणीतील ती

या मनापासून दूर वेडे फक्त तुझे गाव आहे, आठवणीत माझ्या सदाचे फक्त तुझेच नाव आहे. चांदण्यांचे फुल तेव्हा नभांतरी जे उमलले, अजून माझ्या आसमंती केवड्याचा सुवास आहे. सोनसळी यौवनांचा देहावरती भार आहे, अजूनही तूच वेडी सौंदर्याचे परिमाण आहे. मौनामधूनी मार्दवाची माया जी प्रगटते, तीच माझ्या अंतरंगी जीवाचा आधार आहे. तूच वेडे स्वप्न माझे तूच अंतरीची ओढ आहे, माझ्या मनाचा तगमगीला तूच शेवटचा उपाय आहे. ------- अभय बापट १६/१०/२०२२

खुप काही राहून गेले

खूपजणांना भेटायचे राहून गेले खूपजणांशी बोलायचे राहून गेले. डोळे व्याकुळ झाले एका दर्शनाला खूपजणांकडे बघायचे राहून गेले. आपुलकीची ओढ असते मनामध्ये खूपजणांना शोधायचे राहून गेले. एवढ्याश्या वेळात सगळे कसे जमायचे खूपजणांशी जोडायचे राहून गेले. परत येतील का हे आनंदाचे क्षण कधी भेटायचे ते ठरवायचे राहून गेले. ११/१०/२०२२

रंग

जगणं सुंदर आहे  रंगात रंगणं सुंदर आहे. रंग कोवळे उन्हाचे  पावसात न्हाऊन आले तिच्या केंसावरुन त्यांच  ओघळणं सुंदर आहे. कशाला हवेत रंग  हातात फुलपाखरांचे अंगावरती चांदण्याचं  खेळण सुंदर आहे. नकोस करु घाई  रितं होण्याची रंग भरलं रुप तीचं न्याहाळणं सुंदर आहे. इंद्रधनुष्याची काया घेवून  ती समोर आली इंद्रधनुष्याला सामोरं  जाणं सुंदर आहे. ०१/१०/२०२२

नवा भारत

कोण जाणे कसा हा बदलला देश आहे वाल्याने घेतला वाल्मिकीचा वेश आहे. भाव नाही भक्ती नाही प्रेम नाही अंतरी मुखामध्ये सदाचा रामनामाचा घोष आहे. पुर्वजांचे गोडवे अन आप्तांना क्लेश आहे स्वत:पुरतेच जगणे हाच एकमेव उद्देश आहे. वेचले अमाप सुख ज्या झाडांच्या सावलीत त्या झाडांना छाटण्याचा नवा आदेश आहे. -- अभय बापट १७/०९/२०२२

भुताचा जन्म

शहरातल्या गजबजलेल्या भागातील मी जूनी चाळ अनेकांच्या सुखदुःखाची साक्षीदार होत गेली अनेक वर्ष उभी आहे. मी अनेकांचे उभे राहणे आणि मोडून पडणे अलिप्तपणे माझ्या मनावर कोरुन ठेवले आहे.           कधीतरी स्वप्नांनी गजबजलेली आता भितीच्या धुसर छायेत एकाकी वाट बघते आहे माझा हा काळा इतिहास पुसून नव्याने नव्या रुपात पहाटेला सामोरी जाण्याची.           पहाट नेहमीच रम्य असते पण पुढे दिवसावर निसर्गाच्या लहरीपणाची पुटे चढत जातात आणि दिवस कधी संपतो असे होवून जाते, आपल्या हातात उरते फक्त वाट पाहणे, दिवस संपण्याची.           मला आठवतयं, माझ्या अंगणात अनेक कुटुंबे आनंदाने हासत खेळत होती, स्वप्न पाहात सुखाने झोपत होती.तात्याही त्यातलेच एक, एका खोलीत एकटे राहणारे.कुटूंब लांब कोकणात आईवडलांच्या सोबतीला.           गणपतीच्या आधीचे दिवस, धुंवाधार पाऊस, तात्यांनाही गणपतीचे वेध लागलेले पण मालकाचा नेहमीचाच आठमूठेपणा. डबलड्यूटी करुन दिवस भर तरच सुट्टी देईन अशी अट घातलेली.           तात्या उशीरा ध...

कलियुग

कपडे बदलून आले जेव्हा सारे कसाई हंबरेल का हो सांगा प्रेमाने गाय आता. दारात येऊन उभा रावण जेव्हा होता झोपेल का घरट्यात सुखाने माय आता. विश्वास हा विचार तुटून मनात गेला बांधेल का हो धागा मायेने ताय आता. नासून गेले बघ ओटीतच दुध सारे मिळाल का थोडी धगीने साय आता. चाललो होते रस्ता एकटी सुखाचा पोळून राठ झाले आगीने पाय आता. --- अभय बापट १४/०९/२०२२

राधा भेटली नाही

भेटली अनंत नाती, माणूस भेटला नाही कृष्ण भेटला पावलोपावली,राधा भेटली नाही. सुख भेटले अनंतहस्ते,समाधान भेटले नाही विद्या भेटली गुरुमुखातून, ज्ञान भेटले नाही. सखे भेटले वळणावरती,साथ भेटली नाही शब्द मिळाले अविरत इथे , प्रेम भेटले नाही. जिथे तिथे चर्चा गोविंदांची,गोपाळ भेटला नाही आरक्षणा धावतील सारे,रक्षक भेटला नाही. भोगी भेटले आयुष्यामध्ये,योगी भेटला नाही सत्ता भेटली इथे मुरारी,सावली भेटली नाही. विश्वासाने चालत होतो,ध्येय भेटले नाही सर्व मिळाले तुझे कान्हा,राधा भेटली नाही. १९/०८/२०२२

स्वातंत्र्य - असलेले नसलेले

घाबरुन रहावे लागते.......           भिती ही नैसर्गिक प्रवृत्ती असली तर माणूस अनुभवातून काही गोष्टीपासून दूर रहायला शिकतो, ही भिती शारीरिक, मानसिक, सामाजिक आरोग्यासाठी आवश्यक असते.         एखाद्या वस्तीतून,गावातून वाहन चालवताना चालकाला जास्तच जागरुक रहावे लागते कारण त्यांना माहीत झालेले असते की या भागात कणभर अपघात घडला तर तुमची चुक नसली तरी मार तुम्हालाच खावा लागणार.           रिक्षा किंवा टमटम सारखी वाहन कशीही चालवली जातील,तुमची गाडी पुढे आडवी उभी करतील पण त्यांचा धक्का जरी तुम्हाला लागला तरी मार आणि शिव्या तुम्हालाच खाव्या लागतील.           मधमाश्यांच्या पोवळ्याशी छेडछाड न करताही आजूबाजूला वावणाऱ्यांवरसुद्धा त्या झुंडीने हल्ला चढवतात, तशीच माणसांची झुंड तुमच्यावर धावून येते.           माणसांचे संघटन कोणला त्रास देण्यासाठी नसते तो पर्यंतच ते चांगले असते पण एकदा का संघटनेतील विध्वंसक शक्ती समोर आली की....           घाबरुन रहावेच लागते.   ...

आठवण

जपला खिशात मी तुझा रुमाल होता गुलाबी पाकळ्यांचा देही गुलाल होता. आठवणीच्या खजिना उरात साठलेला स्वप्नांच्या वाटेवरचा तो हमाल होता. बांधलेला तुझ्यासाठी शब्दांचा महाल होता शब्दांनीच उभा केला पुढती सवाल होता. चढला होता रंग तुझ्या ही गालावरती की तुझा अभिनय तेव्हा कमाल होता. ----- अभय बापट १३/०८/२०२२
पाखरांनी घेतली भरारी फार झाली. माणसांनी घेतली उधारी फार झाली. उसनी आहे उंची आकाश पाळण्याची माणसांची स्वप्ने विषारी फार झाली. पुर्वा पार जपले गेले माणसाचे माणूसपण पुर्वीच्या काळात माणसे विचारी फार झाली.  शब्दा़ंचा अर्थच हरवला आहे आज काल माणसांची मने विखारी फार झाली. श्वापदांचे घर मनातच असते सदाचे माणसांची वस्ती अत्याचारी फार झाली नको गोंदवूस भाळावरती नाव कुणाचे गर्दीतील माणसे अविचारी फार झाली. सावधपणे एक आता देवाघरच्या हाका नवीन अवतार होण्याची तयारी फार झाली. -------- अभय बापट ०९/०८/२०२२

शब्दयात्री

शब्दात न मावणारे  शब्द नवे देशील का ? आनंदाचे पुष्प सारे  तुज हाती घेशील का ? जोडली होती नाती  शब्दांनी नवी- जूनी एक नाते शब्दवेडे  तू कधी स्मरशील का ? शब्दांनी राखले कायम  इमान अर्थांशी, नीति सोडल्या माणसांना  अर्थ खरा सांगशील का ? शब्द सारे मुक झाले  वाचाळ मुखांपुढे मुक शब्दांमागले अर्थ  तू तरी जपशील का ? शब्द असतो अर्थ वेडा,  भावनांचा भुकेला भावनांचा शब्द सेतू तू सदा होशील का ? ----- अभय बापट २४/०७/२०२२

पाऊस

रुणझुण पैंजणांचा नाद अंगणात, पावसाची झाली पहाट अंगणात. मृग बरसला धारा अंगणात, फुलला सरींचा पिसारा अंगणात. मातीने धरला फेर अंगणात, सुगंधाचा उठला कल्लोळ अंगणात. जीवनाचे पहिले पाऊल अंगणात, सृजनाची नवी ओळख अंगणात. नशिबाची भरली झोळी अंगणात, सुखाची आली सोयरी अंगणात. १६/०७/२०२२

भाग्यरेखा

गुलाबी तुझ्या ओठांवरले  अक्षर होवून उमटावे , आणी नाजूक खळीमधले  अमृत मीच व्हावे. यौवनाचा बहर सारा  उसळून येई असा, भ्रमर होवून बागेमधला  मकरंद प्राशून घ्यावे. भाळावरची बट सुरेख  अनोळखी ती अक्षरे, वाचता वाचता त्यांना  भाग्यामध्ये गोंदवावे. अस्तित्वाच्या सुगंधाने  वातावरण भरुन जावे, आणि एका क्षणासाठी  निसर्गाने स्तब्ध व्हावे. असे असावे तू जवळी  असेच जग संपावे, आयुष्याच्या कातरवेळी  जगण्याचे सोने व्हावे. ०९/०७/२०२२

ओळखत जा तू

सुखाच्या क्षणी कोण लक्षात राहतो... दु:खाच्या क्षणी हाक मारत जा तू वेदनेला दिली मी ओसरी मनाची... व्यथेला पत्ता माझा विचारत जा तू. आषाढाचे दूत आले आज दारी... विरहाची वेदना जाणत जा तू. नको दु:खे गांजू नको सुखे माजू मनाला जरा समजवत जा तू. नसतो सदा मित्र,नसतो सदा शत्रू... माणसाला आपल्या ओळखत जा तू ०१/०७/२०२२
कुणी शहाणा इथे लाचार आहे कुणी स्वत:च्या बुद्धीने बेजार आहे. आता कुठे उरली किंमत ज्ञानवंताला विद्येचा चालला इथे व्यापार आहे. आभाळच झुकते भूमीवरती सदा सत्तेपुढे सर्व काही बेकार आहे. माणूसच कापतो माणुसकीचा गळा प्रत्येकजण आता इथे निराधार आहे. ---- अभय बापट २०/६/२०२२

फादर्स डे

           प्रत्येकाच्या नशीबात कुठे असते आकाशाची निळाई. काहीजणांना झाडाखाली उभं राहून निरखावे लागते दूरवरून तुकड्यातुकड्यात दिसणारे आभाळ,दुसऱ्यांच्या डोक्यावरचे छत बनलेले.            कधी मायेने ओथंबून,भरुन आलेले. तर कधी उबदार शाल पांघरणारे,कधी प्रेमाने भिजवून टाकणारे तर कधी उद्याच्या सुंदर भविष्याचे उमलते केशरी रंग दाखवणारे.             काहीच्या नशीबी असतं दूरवर उभं राहून रिकामी ओंजळ पुन्हापुन्हा निरखत राहते आणि देवाला एकच प्रश्न विचारणे," तू एवढा मायेचा सागर असताना एखादीच ओंजळ अशी कोरडी का, एका थेंबाच्या स्पर्शाला आसुसलेली? १९/०६/२०२२ रविवार, जून मधला तिसरा रविवार अर्थात फादर्स डे           

पाऊस

खुप दिवसांनी पुन्हा एकदा पाऊस भरुन आला  आणि धरत्रीच्या मनामध्ये  आशेचा अंकुर फुटला. खुप दिवसांनी वादळवीज धरणीकडे धावली शेतकऱ्यांच्या हातावर समृद्धीची रेषा उमटली. खुप दिवसांनी माती सुगंधाने नटली कष्टकऱ्याला ओठांवर समाधानाची रेषा दिसली. खुप दिवसांनी मातीमधून सृजनाचा हुंकार आला आणि बाळ माझ्या भुमीचा आईच्या कुशीतच रमला. खुप दिवसांनी वावराला नवचैतन्य आले, शेजारच्या झोपडीलाही स्वर्ग रुप लाभले. ---अभय बापट ०९/०६/२०२२

रुजणे सोडले मी

माणसांना देव मानणे सोडले मी शब्दांना प्रमाण मानणे सोडले मी. भेटून आलो जेव्हा वादळवाऱ्याला स्वप्नांना थांब सांगणे सोडले मी. निखळून पडले माळे मधले मोती नात्यावर अधिकार सांगणे सोडले मी. दाबून टाकले शब्द माझे ओठांमधे वेदनांचे गीत गाणे सोडले मी. तुडवून टाकले अंकुर सारे उमाळ्याचे पुन्हा नव्याने रुजून येणे सोडले मी. दिले होते अभय त्याने जगण्याला हक्काची रुजवात करणे सोडले मी. ०३/०६/२०२२

खुप पुर्वी

मी काहीही न बोलताही तुला सगळं कळायचं  खूप पूर्वी ...... मी काहीही बोलत का नाही हे ही न सांगताच कळायचं खूप पूर्वी...... ०६/०६/२०२२

नशा...

तुझी नशा पुन्हा पुन्हा भुलवून टाकते तुझ्या सुगंधाने मन हे उगाच वेडावते, नको फुलूस अशी रात्री तू पुन्हा पुन्हा तुझ्याविना उदासी ही घुटमळत राहते. अनेकदा तुझ्यामुळे मनात रान माजते अनेकदा तुझ्यामुळे नागीण सळसळते नको चेतवू अशी अंतरंग पुन्हा पुन्हा तुझ्याविना एकांतीही गर्दी देहात दाटते.. वाटते पुन्हा पुन्हा तुझ्या समीप रहावे वाटते पुन्हा पुन्हा डोळे भरुन पहावे, नको घोळवू मनात तू विभ्रमाचा गोडवा तुझ्याविना रात्र एक युगासमान भासते. वाटते पुन्हा पुन्हा तुझ्या रंगात रंगावे वाटते पुन्हा पुन्हा तुझ्या गंधात नहावे, नको मांडू अशी रंगगंधाची आरास तू तुझ्याविना फुलांचेही सौंदर्य लोप पावते. ०२/०६/२०२२

मन...अधांतरी

जगून घ्यावे असे वाटते मरुन जावे असे वाटते, तुझ्याविना श्वासालाही थांब म्हणावे असे वाटते. हसत रहावे असे वाटते रडून घ्यावे असे वाटते, साठवलेल्या आठवणींना लुटून टाकावे असे वाटते. पुन्हा बघावे असे वाटते पुसून टाकावे असे वाटते, स्मृतीमधल्या तुझ्या छबीला "तू कोण?" पुसावे असे वाटते. सारे व्यर्थ आहे असे वाटते निव्वळ स्वार्थ आहे असे वाटते, जे जे आहे आपुलकीचे सारे तसेच जपावे असे वाटते. २५/०५/२०२२

उमेद

चेहऱ्याला सजवावे म्हणतो अश्रूंना लपवावे म्हणतो, नव्या ऋतूच्या स्वागताला नव्याने उमलावे म्हणतो. पुन्हा एकदा रुजावे म्हणतो वादळवाऱ्यात तगावे म्हणतो, कोसळणाऱ्या प्रपातातून स्वत:ला वाचवावे म्हणतो. पुन्हा एकदा उडावे म्हणतो आभाळाला भेटावे म्हणतो, सुकलेल्या एका दाण्यासाठी दोन थेंब मागावे म्हणतो. पुन्हा एकदा जगावे म्हणतो ताठ उभे रहावे म्हणतो, खोल ओलाव्याच्या शोधात खोल खोल जावे म्हणतो. झाडांपासून शिकावे म्हणतो स्वत:ला सावरावे म्हणतो, नको असलेले ओझे टाकून पुन्हा एकदा बहरावे म्हणतो. ----- अभय बापट २२/०५/२०२२

दुकानदारी---एक सहज सोपा व्यवसाय

      दुकानदारी---एक सहज सोप्पा व्यवसाय.        आपल्या धंद्याची सूरवातच " मी माझा वेळ जाण्यासाठी चालू केला आहे" इथून होते. मग धंदा उघडण्याची आणि बंद करण्याची वेळ आपल्या लहरीवर अवलंबून असते यात नवल ते काय ?        आपला बिझनेस स्टडी काय असतो ? कोणता धंदा,व्यवसाय आपल्या जवळपास सुरळीत जोमाने चालू आहे ते बघायचे आणि त्याच्या बाजूलाच तोच व्यवसाय सुरु करायचा, शेजारच्याचे ५०% तरी ग्राहक आपल्याकडे येतीलच या विश्वासाने आणि मग हातखंडे प्रयोग चालू करायचे,स्वत:चा उद्योग वाढवण्यासाठी नाही बरं का, शेजाऱ्याचे दिवाळे निघावे यासाठी.        व्यवसाय आणि कुटुंब,मित्रमंडळी यांना वेगवेगळे ठेवणे आपल्याला कधीच जमत नाही. तुमच्या व्यवसायाचा फायदा उठवायला सगळी असतात पण तुम्हाला मदत लागेल त्या गरजेच्या वेळी कोणीच धावून येत नाही.       आपण वस्तू एमआरपी पेक्षा २ रु. जास्त घेवून विकतो आणि कोणी विचारलेच तर " आमचा हा रेट आहे,हवं घ्या" हा आपला रोखठोकपणा आपल्या तोंडात हजर असतोच.        आपल्याला गिऱ्हाईकाकडून जास्त...

त्रयस्थ

       स्वत:कडे त्रयस्थपणे बघता आले पाहीजे.   तरुण मुलांच्यात एका नवीनच अंधश्रद्धा वाढीला लागलेली दिसतेय, "फेसबुकवर पोरी पटतात" अनेक तरुण मुलं फेसबुकवर या उद्देशाने उंडरलेली दिसतात.   त्यांनी स्वत:कडे त्रयस्थ नजरेनी बघितले पाहीजे,आपल्याकडे असे काय आहे की एखाद्या मुलीने आपल्या प्रेमात पडावे. आपल्याकडे शिक्षण,नोकरी-व्यवसाय, संपत्ती,पर्सनॅलिटी असे काय स्पेशल आहे. स्वप्न बघणं गुन्हा नाही पण ती आपल्या आवाक्यातली असावी, आणि स्वप्नांची बाग फुलवताना खोटेपणाचे पाणी घालावे लागू नये एवढेच. नाहीतर मग मान खाली घालावी लागते स्वत:ला आणि घरातल्या साध्यासरळ पालकांनाही. ---------अभय बापट

जगणे

जगलेल्या प्रत्येक क्षणात मी समाधान शोधत होतो आनंदाच्या प्रत्येक क्षणात मी नव्याने जगत होतो. येत होते फुल आनंदाचे क्षणोक्षणी हातात माझ्या त्या प्रत्येक क्षणाला मी नवा जन्म मानत होतो. बहरत होती बाग फुलांची कित्येकदा नव्याने श्वास घेता घेता मी रोज नव्याने बहरत होतो. सावधपणाच्या हाका कित्येक वेळा आल्या कानी प्रत्येक हाकेला मी नव्याने प्रतिसाद देत होतो. काटेरी झाडांचे रान माजते कारण नसताना अविनाशी राहण्यासाठी पुन्हा पुन्हा झगडत होतो. ------- अभय बापट १९/०५/२०२२

परतीच्या वाटेवरती असेच घडते

परतीच्या या वाटेवरती असेच काही घडते... शब्द सारे मुके होती,डोळ्यांमध्ये पाणी भरते सोडून जाता इथेच सारे,पाऊल ही डळमळते.।। निसर्ग आणी त्याची महता,तूच वसतसी तीथे तत्वता, तुझ्या रुपाने आयष्याचे सार्थक हे होते।। तूच सावरते,तूच घडवते, तूच घड्यांना आकार देते, तुच मांडतो,तूच मोडते,खेळ मोडूनी हाक मारते।। तुझी महती जाणूनही,खेळामधेच मन अडकते. परतीच्या या वाटेवरती असेच काही घडते।। जीच्यासाठी केले सारे, तीच्यापासून मन दूर पळते, परतीच्या या वाटेवरती असेच काही घडते।। समस्यापूर्तीमधली कविता KVD

वास्तव

जो जगण्याला विटला नाही असा कोणीही भेटला नाही. घेतला वसा प्रेमाने वागण्याचा तो थोडा वेळही टिकला नाही. धावला प्रत्येकाच्या अडचणीत स्वत: अडचणीतून सुटला नाही. काढल्या हजार चुका लोकांच्या चुकांमधून स्वत: शिकला नाही. राबला तो आपुलकीच्या ओढीने खिसा कधी सुखाने भरला नाही. दिवा धरला हातात सदा लोकांसाठी पायतळीचा अंधार कधी सरला नाही. --- अभय बापट १३/०५/२०२२

माझं गाव

  बोरकरांनी "माझा गाव" कवितेत लिहीलय,         "जेथे होईल माध्यान्ह तेथे पान वाढलेले.          काळोखात कुणीतरी ज्योत घेउन आलेले."   आता माझे गाव खरंच असे राहिले आहे, नाही ! पण आपल्या मनात अजून तेच जूने आठवणीतले गाव तसेच आहे कारण आपले त्यावरचे प्रेम तसूभरही कमी झालेले नाही.    आपल्या वाटचालीत अशी असंख्य छोटीमोठी गावं आपल्याला भेटतच असतात, आपण पुढे निघून गेलो तरी या गावांबद्दल असेच कायम कृतज्ञ राहीले पाहिजे.     गावं तशीच राहात नाहीत त्यांची शहरं होत जातात,ती विस्तारत जातात,त्यांच्या रस्त्यावरचे आपले ठसे पुसट होत जातात,तरीही आपण मात्र आठवणीतले ते गाव प्रेमाने जपले पाहिजे.ज्यांनी आपल्याला भरभरुन दिले.     माणसं तरी कुठे वेगळी असतात,गावच ती, गजबजलेली. जी आठवणीत जपली पाहिजेत,ज्यांची आठवण जपली पाहिजे,कृतज्ञतेने त्यांच्यात कितीही बदल झाला तरी.        पावसानी अंगणात थैमान मांडलेले        कोणीतरी डोईवरती छत्र घेवून धावलेले.         कोपला होताच सूर्य डोईव...

देव

पावसानी अंगणात थैमान मांडलेले कोणीतरी डोईवरती छत्र घेवून धावलेले. कोपला होताच सूर्य डोईवरचा कधीचा कोणीतरी सावलीचे झाड होवून आलेले. सरली होती ऊब अंगातली कधीची कोणीतरी हळूवार मिठीमध्ये घेतलेले. पेटला होता अंगार सभोवताला द्वेषाचा कोणीतरी येवून मनावर फुंकर मारुन गेलेले. संपत नसतो ओलावा एकाच वेळी जगामधला कोणीतरी असतेच नेहमी देव म्हणून भेटलेले. --- अभय बापट ०९/०५/२०२२

कसं सांगू

कसं सांगू...... तुझ्या मनातील समृद्धी नसतो देवू शकलो सुखाचा सावली नक्कीच धरली असती,कसं सांगू. रंगीबेरंगी जग नसतं दाखवू शकलो रंगीबेरंगी नात्यांचे गाव आंदण दिले असते, कसं सांगू. माझ्या डोळ्यातील अश्रू बघून परत फिरलीस तू तुझ्या अश्रूंसाठी रुमाल झालो असतो, कसं सांगू. उत्कर्षाची ओढ प्रत्येकालाच असते या जगात समाधानाचे नाणेच खणखणीत वाजते, कसं सांगू. स्वप्नांच्या भरारीला नसते बंधन आकाशाचे सत्याच्या घरट्याकडे परतावेच लागते,कसं सांगू. तू शब्दाच्या आधीचे आणि नंतरचे विरामचिन्ह तुझे नाव येण्यापूर्वी थांबावे लागते,कसं सांगू. कसं सांगू म्हणताना खुप काही बोलून गेलो तुझ्यापर्यंत पोचण्याआधी शब्दांना रोखावे लागते, कसं सांगू. ०७/०५/२०२२

पुन्हा एकदा सारेजण एकत्र भेटूया..

पुन्हा एकदा सारेजण एकत्र भेटूया, विखुरलेल्या आनंदाला सारे मिळू वेचूया.         पुन्हा एकदा सारेजण एकत्र भेटूया. गप्पाटप्पा आणि गाणी रुसवेफुगवे याची कहाणी हरवलेल्या स्वप्नांना डोळे भरून पाहूया.          पुन्हा एकदा सारेजण एकत्र भेटूया. तू तू मी मी खुप झाले आता सारे विसरु या गुंतलेल्या धाग्यातून पुन्हा मैत्री विणूया.         पुन्हा एकदा सारेजण एकत्र भेटूया. वर्ष सरतील आणि पावसाळे वादळ वारे आणि उन्हाळे एकमेकांच्या सोबतीने आपापले घरटे जपूया.          पुन्हा एकदा सारेजण एकत्र भेटूया. तुमचे आमचे सेम असते कधी चांदणे कधी ऊन असते काळोख्या रात्रीकडे उजेड होवून धावूया.         पुन्हा एकदा सारेजण एकत्र भेटूया. ०२/०५/२०२२

मोगरा

मौनातून मोगऱ्याने दोन सुगंधी शब्द दिले, त्या शब्दांनाच मी कविता असे नाव दिले. अंगणामधला धुंद मोगरा मनामध्ये गजबजून जातो, आणि तिच्या केसांमधल्या श्रावणधारा घेवून येतो. अजून त्या झुडपामधला बटमोगरा हळूच हसतो, आणि माझा पाय हळूच तिच्या घराकडे पुन्हा वळतो. काळ्याकाळ्या नागीणीला मोगऱ्याची भेट वाहतो आणि तीच्या नजरमधून चंद्र उगवताना पाहतो. ---- अभय बापट ०१/०५/२०२२

थांब मित्रा

आयुष्य ओझे वाटत आहे , थांब मित्रा सौख्य तुझ्याशी भांडत आहे, थांब मित्रा. नको उधळूस क्षण सुखाचे वाऱ्यावरती बाहेर वादळवारा वाढत आहे, थांब मित्रा. क्षणाक्षणाला येत असतात अन्यायाचे लोंढे सुख हातातून सुटत आहे, थांब मित्रा. नको मांडू वैर असे प्रत्येकाशी माणसातूनच देव घडत आहे, थांब मित्रा. असेल विश्वास मनगटावर जर तुझा घामातून जीवन फुलत आहे थांब मित्रा. असेल कोणी पाठी लढ म्हणून सांगणारे धिरापोटीच जग चालत आहे,थांब मित्रा. असेल अभयहस्त पाठीवरती सद्गुरुंचा आशेवरती जग जगत आहे, थांब मित्रा. ----अभय बापट २६/०४/२०२२

ओझी

माथी हजार ओझी घेवून चालतो मी मुखी हजार बंध असून बोलतो मी. वेचली अमाप नाती कोवळ्या विणीची मनी सुगंधी कोडी जपून चालतो मी. आभाळी अजोड नक्षी,दाटलेल्या मेघमाळी उमलून पुन्ही देही अजून नाचतो मी. थोपवून चांदणे काठावर पापण्यांच्या आठवण रेशमाची ठेवून जागतो मी. -------अभय बापट २६/०४/२०२२

दुमडलेले कोपरे

दुमडलेले कोपरे... भरल्या असत्य गोष्टी सदा मनात आमच्या ते खुशाल येवून आज कान पिरगळू लागले. कोपरे पुस्तकाचे अश्रू ढाळीत बसले शब्दवेल्हाळ पान मनात दरवळू लागले. नको काढूस खोडी त्या उसन्या पुस्तकांची अपमान पुस्तकांचे मला छळू लागले. आहे तमा कुणाला त्या ज्ञान संचिताची तुमच्या खेळात बिचारे पान गळू लागले. मग आठवणींनी त्यांच्या माजले मनात रान दुर्मिळ म्हणून ते जगात दरवळू लागले. अभय बापट २५/०४/२०२२

अश्रू

अश्रूंचे हिशेब कोणाला द्यायचे नाही सुख कोणाच्या अधीन करायचे नाही. रोजच जपतो श्वासांना ज्या जगण्यासाठी  जीवन कोणाकडे गहाण ठेवायचे नाही. स्वत:च्या सुखासाठी हजार इमले रचतो पाया रचण्यासाठी कोणापुढे झुकायचे नाही. अश्रूंची वाहीली जरी डोळ्यांतून नदी कोणाच्या अश्रूंमुळे यापुढे द्रवायचे नाही. मी सुखात आहे हे कोणाला सांगायचे नाही आपल्या सुखाशी यापुढे कधी भांडायचे नाही. --अभय बापट २४/०४/२०२२

हे शब्दांनो....

हे मित्रांनो शब्द व्हा कुंठल्या गीतास माझ्या प्रतिभेचे पंख द्या. हे मित्रांनो शब्द व्हा...... अलौकिकेची साधना जी शब्दांत मांडली तुम्हा, प्रतिभेचे दोन थेंब आज मला प्राशू द्या. हे मित्रांनो शब्द व्हा.... छंद,वृत्त आणि मात्रा सदा वसती इथे, कोंदणात त्यांच्या आज भावनांना उमटलू द्या. हे मित्रांनो शब्द व्हा..... हे शब्दांनो मित्र व्हा कुंठल्या गीतास माझ्या प्रतिभेचे पंख द्या... हे मित्रांनो शब्द व्हा.  -----अभय बापट. २४/०४/२०२२ टिप---- क्षमस्व, कविवर्य कुसुमाग्रज, हे विडंबन नाही, ही साद आहे शब्दांना आणि मित्रांना अडलेली कविता पुर्ण करण्यासाठी.

अनोखी बात

तुच माझ्या आयुष्याची ती अनोखी बात आहे तुच माझ्या आयुष्याची नव्याने सुरवात आहे. डोळ्यांमध्ये डोळे गुंतले, श्वासामध्ये श्वास ग तुच माझ्या आयुष्याचे ते सुरीले गीत आहे. तुच आहे आदी आणि अंतामाही तूच आहे तुच माझ्या आयुष्याचे पर्व जे अज्ञात आहे. असूनही नजरे समोर मृगजळासम दूरआहे तुच माझ्या आयुष्याची जगण्याची रीत आहे. प्रतिभेचा स्पर्श नसूनही पुन्हा पुन्हा बोलतो तुच माझ्या आयुष्याचा स्पर्श,ज्यामुळे विख्यात आहे. भावनेची ओळख तू दिली,जी सर्वाहून गोड आहे. तुच तो आयुष्यातील क्षण,जो प्रेम म्हणून प्रख्यात आहे.  ----अभय बापट २४/०४/२०२२

जागतिक पुस्तक दिन

मला पुस्तकं वाचायला आवडतात..... ती स्वत:च एक पुस्तक आहे.... मला अर्थ समजून घ्यायला आवडतो.... ती स्वत:च शब्दामागे दडलेला अर्थ आहे... मला शब्दांमध्ये न सामावलेले गुज जाणायला आवडते.... ती स्वत:च मौन आहे,शब्दांना अर्थाचे कोंदण देणारे... मला मुक राहून पुस्तक समजून घ्यायला आवडतात... ती स्वत:च माझ्या मुकपणाला अर्थ देणारं महाकाव्य आहे. मला ती आवडते... तिने दिलेल्या अर्थामुळे परिपूर्ण झालेला मी तिला आवडतो. पुस्तकं अशीच असतात, सर्वांना सामावून घेणारी आणि न उलगडलेल्या प्रश्नांची कोडी सोडवत प्रत्येक क्षणाला अर्थ देणारी. -----अभय बापट २३/०४/२०२२

बहावा

पिवळा पिवळा साज लेऊन नववधू सजली, पर्जन्यराजाच्या आगमनाची वाट पहात बसली. ऋतूराजानेही फुलवला सृष्टीचा मळा, सुस्वर गाणी उमटती पक्षांचीया गळा. माणसांनाही लागली मग सुखाची चाहूल, वर्षाराणीच्या मागून पडेल समृद्धीचे पाऊल. निसर्गांनेही उमटवल्या सावधगिरीच्या खुणा, वसंतामागून ग्रिष्माच्या दाहक पाऊलखुणा, उतू नकोस, मातू नकोस जप देवा घरचे देणे, एकदा हातून निसटले तर नशीबी वाट पाहाणे. -----अभय बापट २२/०४/२०२२

मुक्तक

गोड हसूनी नकार देते तेव्हा खुपच शालीन दिसते, हृदयावरती आघात करते तरी हृदयामध्येच राहते. २१/०४/२०२२

सांग देवा

कुठून उपजते वैर आत, सांग देवा कुठून उगवतो द्वेष मनात,सांग देवा. चातकाने झेलले जिथे मोती मुखात कोण पेरते विष अंतरात, सांग देवा. चांदण्या रात्रीत ग्रहण कसे लागते कोण फिरवते दिवस जगात,सांग देवा. अमृताचे फळे झाडाला आली कधी कशी शिरली किड फळात, सांग देवा. प्रयत्नाने भरली होती जत्रा भक्तीची कसा उसळला उन्माद अंगात,सांग देवा. शब्दसुमनांची उधळण जिथे केली कधी कुठून पेटला अंगार शब्दात,सांग देवा. © अभय बापट १८/०४/२०२२

अनुभव

कोणी हसवून गेला  कोणी फसवून गेला, शाळेमध्ये अनुभवाच्या कोणी बसवून गेला. रीत जगाची जगावेगळी कोणी दाखवून गेला, मर्म स्वभावाचे वेगवेगळे कोणी समजावून गेला. किती स्पर्धा जगात आहे कोणी सावरुन गेला, स्पर्धेच्या युगात तुम्हाला कोणी हरवून गेला. तुमच्यासाठी होते नाते अमूल्य कोणी तोडून गेला, जपलेले धागे तोडताना कोणी दुखावून गेला. ऊन पावसाचा खेळ  कोणी वापरुन गेला. साळसूदपणे येवून कोणी विसरुन गेला. १७/०४/२०२२

मागणे....

कल्पनेचे पंख मला कधीतरी देशील का ?, शब्द होवून माझ्या हाती शब्द सुमने देशील का ?. प्रतिभे तू माझ्या माथी कृपा छत्र धरशील का?, कधीतरी माझ्या हाती सृजनाचे देणे देशील का ? कल्पनेच्या तीरावरुन कृष्ण मुरली घूमेल का ? आणि माझ्या शब्दा़मधून राधा मुर्त सजेल का ? अलौकिकाचा दिव्य स्पर्श उराउरी भेटल का ? आणि आयुष्याच्या संचिताला एक कविता स्फुरेल का ? १२/०४/२०२२

भेट तुझी

नको त्या रस्त्यावरुन साद आली नको त्या वळणावर भेट झाली. गेलीस तू पांघरुन चांदणे सारे उजेडाची जेव्हा मला सवय झाली. किती वेचू फुले अंगणातली माझ्या जिथून तू काल पदर झटकून गेली. उंबरा अजूनही सुगंधी आहे मनाचा ज्यातून तुझ्या पावलांची चाल झाली. येते अजूनही पहाटे जाग पाखरांना त्यांनाही तुझ्या गाण्याची सवय झाली. घेवून फिरतो सुखाची उब मनात माझ्या जेव्हा तू समाधानाशी भेट करुन दिली. १०/०४/२०२२

असर

तेरी रिश्ते का असर ऐसा छा गया । की मेरी जिंदगी मे फिरसे बसंत आ गया।। १०/०४/२०२२

कॉपी...

      खुप पूर्वी चिठोऱ्यांवर,रुमालावर कॉपी करण्याची पद्धत होती तेव्हा आईला एक प्रश्न नेहमी पडायचा," तो प्रश्न परिक्षेत येईल याची एवढीच जर खात्री आहे तर त्याचा अभ्यास का करत नाही ?      एखादी पोस्ट हिट आणि ट्रोल होवून डिलिट होण्यापूर्वी त्या पोस्टचे घेतले गेलेले स्क्रिनशॉट बघितले की मला प्रश्न पडतो," एवढाच जर तो विषय हॉट आहे हे तुम्हाला माहीती असेल तर तुम्ही स्क्रिनशॉटमध्ये वेळ न दवडता त्या पोस्टला समर्थन किंवा विरोध करणारी पोस्ट का करत नाही ?      "दुसऱ्यांनी प्रयत्नपूर्वक चोरलेल्या आंब्यातील एक आंबा पळवण्यापेक्षा पुर्ण आढीवरच तुमचा हक्क का सांगत नाही ?"       ट्रोलिंगच्या बादशहाला ट्रोल झालेले बघून वाटते........ ०७/०४/२०२२

वैश्विक सत्य...

वैश्विक सत्य---- १) निगेटिव्ह पब्लिसिटी ही व्यवसायवृद्धीसाठी वापरली जाते मग तो व्यवसाय राजकारणाचा असो, समाजकारणाचा असो किंवा संस्कृतीचा असो. २) निगेटिव्ह पब्लिसिटीसाठी भाड्याने माणसे मिळतात, भाड्या हा एक व्यवसायीक घटक असून सत्य अधोरेखित करणाऱ्या रंगीत पेन्सिल एवढेच त्याचे महत्व असते, त्याने सत्यावर काहीही परीणाम होत नाही, योग्य किंमत दिली की बाजारात उपलब्ध होतात. ३) संस्कृतीपेक्षा अर्थकारण जास्त अर्थपुर्ण असते. आपल्या ग्रंथांमध्ये आंब्याच्या झाडांचा उल्लेख आहे,हापूस आंब्यांचा नाही. नाही म्हणायला ऐतिहासिक साहित्य इवल्याश्या लिंबाचे रुपांतर रसदार सोनसळी हापूस मध्ये होते असे उल्लेख सापडतात. जिज्ञासूंनी आचार्य काकोडकर यांचे ग्रंथ अभ्यासावेत. किंवा हैदोस, बिनधास्त कथा या तत्कालीन साहित्याचा अभ्यास करावा. "आनंदध्वजाच्या कथा" किंवा "कथा कालचा-आजच्या आणि उद्याच्या" या रसग्रहणात्मक ग्रंथांचा उच्च अभ्यास करावा, थोडासा आनंद साधला तर साधू शकेल. ४) ट्रोलिंग हे दुधारी तलवारीसारखे असते ते कधीतरी तुमच्यावरच उलटणार असते, "हर कुत्ते के दिन होते है" वाक्य कायम स्मरणात ठेवाव...

सेक्स रॅकेट

सेक्स रॅकेट         सेक्स रॅकेट बनवून तरुण स्त्रीयांना धंद्याला लावणे नवीन नाही. आपल्या राजकीय स्वार्थासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना सेक्स रॅकेटमध्ये अडकवून त्यांना गुलाम बनवणे हा तर राजकारण्यांचा हातखंडा खेळ बनलाय. पण  एक नवीनच प्रकार घडताना दिसतोय,एका मुर्ख,अर्धवट तरीही स्वत:ला बृहस्पतीचा बाप समजणार्या, लग्नाच्या घाईला आलेल्या बाप्याला लुबाडण्यासाठी एक रॅकेट बनवून, एक लग्न झालेली, दोन मुलांची आई असलेली बाई त्याला दाखवली गेली. आता खरे समोर आले तोपर्यंत तो मुर्ख लग्नाच्या स्वप्नात पुरता गुरफटला गेलाय. आजूबाजूची गुंड, लबाड माणसं गिधाड बनून घोटाळू लागली आहेत.   आज गावात हा प्रकार होतोय, उद्यापरवा तुमच्या जवळच्या तरुण मुलांबाबतही घडू शकते,  सावधान रहा, सतर्क रहा, शक्य असेल तर लुबाडला जाण्याऱ्याच्या बाजूने ठामपणे उभे रहा.

भूतदया...

भूतदया....     तो श्वानप्रेमी, कुत्र्याला कुत्रा म्हटले तर कुत्र्याच्या मालकाच्या भावना दुखावतात. तर,तो श्वानप्रेमी आपल्याकडे जन्माला आलेल्या आणि ओझं झालेल्या छोट्याश्या पिल्लाच्या आयुष्याची दोरी तापलेला रस्ता आणि तळपत्या ऊन्हाच्या स्वाधीन करुन आपल्या घराच्या सावलीकडे निघून गेला.       तो इवलासा गोळा आपल्या काळ्याभोर, भेदरलेल्या डोळ्यांनी बघत रस्त्यावरच्या गाड्यांपासून स्वत:ला वाचवण्यासाठी पुलाच्या कठड्याला चिकटून बसला होता.      रस्त्यावरुन सायकलवरुन जाणाऱ्या एका शाळकरी मुलाच्या मनातली भूतदया जागी झाली, तो सायकलवरुन उतरला आपल्या वॉटरबॅगमधले थोडसे पाणी त्या पिल्लाच्या तोंडात ओतले आणि दोन मिनिटे विचार करत उभा राहीला.      काय विचार केला त्याचे त्यालाच ठावूक, त्याने त्या पिल्लाला अलगदपणे उचलले आणि आदल्या दिवशी देवाला वाहिलेली फुले दुसऱ्या दिवशी निर्माल्य झाल्यावर जेवढ्या निर्विकारपणे पुलावरुन पाण्यात विसर्जित केले जाते, तेवढ्याच निर्विकारपणे त्याला पुलावरुन खालच्या पाण्याच्या स्वाधीन केले.        रस्त्यावरची रहदा...

कारण काय.....

वाचत नाही असे नाही ऐकत नाही असे नाही का जाणे आजकाल शब्द मनात ठसत नाही. भेटत नाही असे नाही बोलत नाही असे नाही, का जाणे आजकाल नातं पुर्वीसारखे टिकत नाही. चालत नाही असे नाही रमत नाही असे नाही का जाणे आजकाल निसर्ग मनात फुलत नाही. जोडत नाही असे नाही जपत नाही असे नाही, का जाणे आजकाल नाळ कोणाशी जुळत नाही. समजत नाही असे नाही उमजत नाही असे नाही, का जाणे आजकाल जास्त कोणाशी पटत नाही. पुजत नाही असे नाही भजत नाही असे नाही, का जाणे आजूनही माझे मी पण सरत नाही. ०४/०४/२०२२

आषाढ

आषाढस्य प्रथम दिवशी पावसाचा लागे लळा, चिखलामध्ये पाय रोवूनी वाट बघत बसतो बगळा. शब्दांची ती मासोळी बघ सरसर सरसर पळून जाते, चिखलामध्ये चोच खुपसूनी वाट बघत बसतो बगळा. मासोळी ती वेचून मग तो घरट्याकडे परत फिरतो पिल्लांसवे खाता खाता मग एक कविता गातो. शब्द,सृष्टी आणि पाऊसधारा वाहणारा अविरत वारा, काळे कुंतल,सुंदर मुखडा कालिदासाचा प्रभाव सारा. मग सारे धावून येती बगळ्याचे त्या सगे सवंगडी, संमेलन भरुन म्हणती मीच फाकडा, मीच फाकडा.

चारोळी...

१) पुढे पुढे जाताना     काही मागे मागे राहते,     आठवणींनी तुझ्या मी     धडपडताना सावरते. २) सोबतीचा सुटला हात तरी     आठवणींना गंध आहे,     उसवले टाके जरी     धागा अजून अभंग आहे. ३) सुर्य आणि चंद्र     एकमेकांसाठीच बनलेले,     कधीही न भेटताही     अंतरंगातून जोडलेले. २६/०३/२०२२

रोजच...

रोज सकाळ होते रात्रही रोज सरते, माणसाचे मन का नैराश्याने भरुन राहते. प्रकाश रोज होतो रोजच माघारी फिरतो, माणसाच्या मनात का काळोख भरुन राहतो. पक्षी रोज येतात घरट्याकडे परत फिरतात, माणस अशी का  रस्ता विसरुन हरवतात. पाऊस नेमाने येतो ऋतू नेहमीच बदलतो माणूस असा का एकाच जागी अडकून बसतो. २६/०३/२०२२

प्रेमच..

प्रेमच होते ते ओठांमधून मांडलेले, डोळ्यांमध्ये भरताना गळ्यामध्ये गुंतलेले. प्रेमच होते ते स्वप्नांमध्ये असलेले सत्यापासून दूर जात अपेक्षांमध्ये रुतलेले. प्रेमच होते ते सोबतीमध्ये बसलेले, सुटलेला हातासोबत दूर जाऊन बसलेले. प्रेमच होते ते आपलं तुपलं करणारे, एकमेकांच्या ओढीने गालावरती खुलणारे. प्रेमच होते ते मुकपणे बघणारे, दूर राहून क्षणाक्षणाला काळजामधून तुटणारे. प्रेमच होते ते पावसासारखे बरसणारे, वेळ संपली की अलगद काढता पाय घेणारे. २५/०३/२०२२

दुर्बोधता

कोशांमधले शब्द निराले आयुष्याला घाली कोडे, तुमच्यामाझ्या आयुष्याला पुरते एकच शब्दकोडे. नकोत मजला शब्द हजारो नकोत त्यांचे अर्थ नवे, तुमच्यामाझ्या कवितेसाठी सहजसोपे शब्द हवे. पाऊस असा कोसळतो दुर्गम होते जीणे शब्दांचेही माजता रान दुर्बोध होते चालणे. चांदणे तुझ्या स्मरणाचे जीवाला घाली कोडे, अर्थ कसे शोधावे त्या खोल डोहामध्ये थोडे. संध्यासमयीच्या शब्दांना कातरतेचे लेणे, चांदणे कसे आणावे चंद्रमाधवीच्या खोऱ्यामधले. प्रदेश साकल्याचा मी आकळण्यात गुंतलो शब्दांच्या खोल डोही मी माणीक होवून पडलो. २६/०३/२०२२

मुक्तक :-

आकाशाच्या रिक्तपणाच्या असतील काही कथा सूर्याच्या जळण्यापाठी असतील त्याच्या व्यथा नको शोधूस गुढ वाऱ्यावरच्या सुगंधाचे त्यांच्या कणाकणात मिळतील समर्पणाच्या गाथा. २५/०३/२०२२

असे नाही

मी कविता करतो असे नाही शब्दांशी खेळ करतो असे नाही, रचतो मनात मी स्वप्नांचे इमले भावनांना सूर देतो असे नाही. मी सुख मागतो असे नाही मी दु:ख झेलतो असे नाही, चालतो वाटेवरुन एकटाच मी आनंदासाठी मार्ग शोधतो असे नाही. मी सोबत शोधतो असे नाही मी एकाकी जगतो असे नाही, झुंडीत धावणे नाही मंजूर मला मी हात झिडकारतो असे नाही. मी स्वप्न पाहतो असे नाही मी सत्य नाकारतो असे नाही, वेचली फुले सुगंधाची जेथे त्या रोपट्यांना विसरतो असे नाही. मी विसरुन जातो असे नाही मी मुद्दाम स्मरतो असे नाही उगाच घेवून हातात कोळसा काळा पुन्हा पुन्हा तोच उगाळतो असे नाही. १५/०३/२०२२

कशाला.....?

कालच्या आठवणींना फुले वाहू कशाला त्या सुगंधाला नवी साक्ष काढू कशाला. मार्ग दाखवला त्या चेहऱ्यावरच्या चांदण्याने उजेडासाठी आता पौर्णिमेची वाट पाहू कशाला. चाललो आजवर मी निःशंक पाठीमागे आता नव्याने त्यावर उगाच शंका घेवू कशाला. नव्हते मागितले कोणाकडे काही कधी मी आता शेवटच्या क्षणी मी भिक मागू कशाला. स्पर्धा नव्हती कधी मानली जगणे ही आता उर फुटे पर्यंत सुखापाठी धावू कशाला. अस्तित्वाची लढाई असतेच प्रत्येकाच्या नशीबा आशीर्वादाचे हात पाठी असता मी घाबरु कशाला. १५/०३/२०२२

गैरसमज

मनातमध्ये उठणारे शब्द कंठामध्ये रुतून बसतात, डोळ्यात येणाऱ्या अश्रूंना बघणारे चूक समजतात. मायेने भरलेले डोळे द्वेषाने गढूळ होतात, डोळ्यातल्या भावाला वासनेची भूक समजतात. आपुलकीनी जपलेले दुर्लक्षाने दुरावतात, जोडू पाहणाऱ्यांना नात्यांची भिक समजतात. समजवणारे शब्द अपेक्षेने मार्ग दाखवतात, चुकणारे मात्र त्यांना पाठीवरती चाबूक समजतात. १५/०३/२०२२

आभार.....

कोठे शोधवे शब्द ज्यांंनी माणसे जोडली जातात, नात्यांच्या पानावर दवबिंदू होऊन सजतात. कोठे शोधावे शब्द जे विद्या घेवून येतात, अभंगांच्या गाथेमध्ये श्रद्धा होवून राहतात. कोठे शोधावे शब्द जे प्रेम घेवून येतात, मधुसूदनाच्या बासरीमधून सूर होवून उमटतात. कोठे शोधावे शब्द जे ज्ञान घेवून येतात, जीवनाच्या वाटेवरती गीता होऊन प्रगटतात. कोठे शोधवे शब्द जे माया घेवून येतात, कृतज्ञतेच्या भावनेला लोकांपुढे मांडतात. कोठे शोधावे शब्द भावनांना अर्थ देतात, दोन अनोळखी माणसांना सेतू बनून जोडतात. १४/०३/२०२२

कामना जन्मदिनाची

माझ्या श्वासांची बासुरी तीच्या ओठांनी वाजावी, आजची रात्र तरी तीच्या सुरात सरावी. आसुसल्या गात्रांना तिने कवेमध्ये घ्यावे, चंद्र आणि चांदण्यांनी पुन्हा मिलन रचावे. तीच्या डोळ्यांमधून दुधाळ चांदणे झरावे, अंगावर पांघरुण तीने मायेचे धरावे. आशेचे अंकुर पुन्हा मनी रुजवावे, स्निग्ध तीच्या मनातून नित्य नेमाने भिजवावे. माझ्या अंतरीचे बोल तीच्या शब्दात रुजावे, माझ्या मनाच्या अंगणात त्यांचे ठसे उमटावे. माझ्या डोळ्यातले पाणी तीच्या मेघात झरावे, तिच्या रेशमी हाताचे मोरपंख फिरावे. माझ्या वेदनांचा बांध तीच्या अमृताने भरावा, माझ्या पुढच्या वाटेवर नवा स्वर्ग उतरावा. एवढ्याश्या आशेने माझ्या मनामध्ये यावे, आणि नभाच्या आडोश्याने तीने सोनचांदणे शिंपावे. माझ्या मनामध्ये तीने घर सजवावे आणि तिच्या सान्निध्याने देव शब्दांतून यावे. १३/०२/२०२२

सोपे असते...

सोपेच असते तुझे वागणे सोपेच असते गुंतत जाणे, सोपेच असते भिजून चिंब केस पुसूनी मोकळे होणे. सोपेच असते तुझे हसणे सोपेच असते शब्द जोखणे, सोपेच असते गालात हसून अनोळखी होवून निघून जाणे. सोपेच असते जीव लावणे सोपेच असते जपत जाणे, सोपेच असते सारे पुसून कोरी पोटी हाती धरणे. सोपेच असते बहरुन येणे सोपेच असते वाटून देणे सोपेच असते नव्या ऋतूला नव्या पालवीने सामोरे जाणे. २७/०२/२०२२

प्रेम करायचे राहून गेले

प्रेम करायचे राहून गेले मनात खुप स्वप्न होती रंग भरायचे राहून गेले. प्रेम करायचे राहून गेले. खुप शब्द ओठांवरती. काव्य करायचे राहून गेले. प्रेम करायचे राहून गेले. कोणी हसले गालामध्ये थोडे हसायचे राहून गेले, प्रेम करायचे राहून गेले. जिवन होते नजरे समोर तरी जगायचे राहून गेले, प्रेम करायचे राहून गेले. आपुलकीमध्ये पुर्ण भिजलो त्यांना जपायचे राहून गेले, प्रेम करायचे राहून गेले. ८/०३/२०२२

आई....

जगातले पहिले शब्द आईच्या हुकांरात उठले, तिच्या लेकरांनी ते आपल्या स्पंदनात ठेवले. जगामध्ये पहिले काव्य आईच्या डोळ्यात उमटले, तिच्या लेकरांनी ते शब्दा शब्दात ओवले. जगातले पहिले सूर आईच्या ओठातून आले, तिच्या लेकरांनी ते आपल्या कानात जपले. जगातले पहिले गीत आईच्या हृदयात प्रगटले, तिच्या लेकरांनी ते इवल्या पापणीत सजवले. ६/०३/२०२२

काही सुचले नाही

वाट पहाणे सुचले नाही नवी शोधणे सुचले नाही आपुलकीचे गाव लागले घर बांधणे सुचले नाही माणसांनी ही नाव टाकले विसरुन जाणे सुचले नाही. मार्ग बदलले आप्तांनी इथे सत्व सोडणे सुचले नाही. सोडून देवून माझे मी पण तुझे होणे सुचले नाही. सुचवत गेला खाणाखुणांनी समजून घेणे सुचले नाही. उशीरा सुचले हे शहाणपण वेळेवरती हे सुचले नाही. २८/०२/२०२२

तू आणि मी

तू शांत रातराणी मी घनगर्द अंधार झालो, तू सुगंधी पाकळी मी जपणारी कुपी बनलो. तू सुगंधी गुलाब मी जपणारा काटा झालो, तू कोवळी टवटवी मी उगवणारी पहाट बनलो. तू नाजूक प्राजक्त मी मनभावन सुगंध झालो, तू पायतळी सडा मी ओली जमीन बनलो. १/०३/२०२२

ओंजळ

ओंजळीत पारिजात मन मोहरुन आले, जणू चैतन्य हातातून हृदयामध्ये विसावले

मराठी गौरव अभंग

मीही एक वारकरी माय मराठी पंढरी, नतमस्तक होवू तेथे जेथे कवींची पायरी. करु रिंगण सोहळा खेळ शब्दांचा मांडून, शब्दसृष्टीच्या ईश्वरा तेथे करुया नमन. दिव्य सारे अलंकार सजवू आपल्या देवाला, नाचवू दिंड्या पताका गुंफू शब्दांची तुलसीमाला. आपल्या इवल्या पावलांनी चालू मोठ्यांची पायवाट, शब्दसृष्टीचे मायबाप होवो सदा कृपावंत, हजारो वर्षांचा सोहळा रंगतो भाषेचा हा मेळा, चालो समृद्धीच्या वाटे लाभो स्वर्गाच्या कळा. तुझ्या नामाचा ग टिळा लागावा माझ्या माथी, बोल माझा चिमखडा रुजू व्हावा तुझ्या गाथी. तुझ्या ऐश्वर्याचा घडा सजे महाराष्ट्राच्या मनी तुझ्या अमृताचा लाभ  घेई माय मराठीचा धनी. २७/०२/२०२२

अभंग प्रेमाचा

माझ्या कवित्वाचा अंश माझ्या वेदने मागचा दंश माझ्या शब्दांचा सारांश तुझ्यापायी. माझ्या आनंदाचे निधान माझ्या स्वप्नांचे विधान माझ्या समृद्धीचे गान तुझ्यापायी. माझ्या कल्पनेचा खेळ माझ्या अनुभवाचा मेळ भावनांचा कल्लोळ तुझ्यापायी. माझ्या कवितेतला भाव माझ्या शब्दांतील ठेव माझ्या कल्पनेतला जीव  तुझ्यापायी. माझ्या कवित्वाची धनी माझ्या हातातील झरणी स्फुरते माझ्या मनी तुझ्यापायी. २६/०२/२०२२

रे आयुष्या

पाऊसधारेत भिजायचे राहून गेले रे आयुष्या, प्रेम करायचे राहून गेले. रंगांनी भरला होतो मळवट फुलांचा रे आयुष्या, रंगात रंगून जायचे राहून गेले. सुगंधाने कोरले होते लेणे हवेमध्ये रे आयुष्या, स्वत: सुगंधी व्हायचे राहून गेले. आई नावाचे बिरुद मिरवले वेळोवेळी रे आयुष्या, कसे ते माऊली बनायचे राहून गेले. मी पण माझे सदा मिरवले पावलोपावली रे आयुष्या, दुसऱ्यांचा विचार करणे राहून गेले. २५/०२/२०२२

झाड आणि माणूस-नवकवीता

झाडं सगळं सहन करतात, बदललेल्या ऋतूं पासून, बदललेल्या माणसांपर्यंत घरटं सोडून जाणाऱ्या पक्षां पासून,  रस्ता हरवलेल्या पाखरांपर्यंत. सहन करतात म्हणजे दुखत नाही असं नाही, वाऱ्यावर डोलताना दिसतात म्हणजे रडत नाहीत असं नाही. पण आशेने सांभाळत बसतात,  खोलवर रुजलेल्या मुळांना  आणि  हिरवागार रंग घेतलेल्या पानांच्या तुऱ्यांना. आशा ऋतू पुन्हा वेळापत्रक सांभाळतील, पक्षी पुन्हा गाणी गातील,  पिल्लांना शिकवण्यासाठी फांद्यांचे झोके करतील. माणसही पुन्हा माणसासारखी वागतील,  भरभरुन खुडताना,कणभरतरी भुईला देतील. माणसंसुद्धा झाडांसारखीच  आशेचे पंख लावून उभी असतात आजकाल. हिरवळीच्या कोपऱ्यावरच्या ओलाव्याच्या शोधात, कोणी कृतज्ञतेने आणून रोवेल आठवणींचे बीज, ज्यातून फुलतील माणूसकीचे मळे, एकमेकांच्या दु:खाने होरपळणारे  आणि  आनंदाच्या तृणावर फुल होवून डोलणारे. २५/०२/२०२२

नवकवीता

मलाही कधीतरी तरुन जायचा होता, नव-काव्याचा अथांग, दुर्बोध, जीवघेणा सागर. छंद, वृत्त, यमक या जिवनरक्षक साधनांच्या सहाय्याशिवाय, फक्त विरामचिन्हांची वल्ही वापरुन. गद्याच्या धुक्यात दडलेल्या भावनांना  शोधायचे होते नवकवितेच्या रुपात. मलाही मिरवायचे होते  नवकवीचे बिरुद लावून  साहित्य शारदेच्या दरबारात  एक यशस्वी मानकरी म्हणून. २५/०२/२०२२

सहारा

अंधेरे में उजाला बनकर आए थे हम तिनके का सहारा लेकर आए थे हम। आप यु हीं सबसे जुदा हो बैठी दिल की उमंग बनकर आए थे हम।। २५/०२/२०२२

फार काही नको

फार काही मागत नाही कधीतरी बोलत जा, आनंद ठेव मनामध्ये दु:ख तरी सांगत जा. फार काही मागत नाही कधीतरी दिसत जा, नेहमी आली नाहीस तरी दिलखुलास हसत जा. फार काही मागत नाही कधीतरी स्मरत जा, तुटून गेले सर्व तरी आठवणी जपत जा. फार काही मागत नाही स्वत:ला जपत जा, माझ्यासाठी नाही तरी स्वत:साठी देवाकडे मागत जा. फार काही मागत नाही आठवणीत येत रहा, विसरलीस मला तरी  माझ्या मनाला उजळत जा. २४/०२/२०२२

एकदा असे व्हावे

एखादे गाणे असे गावे नभामध्ये भरुन रहावे, एकदा प्रेम असे करावे जिवन सारे सार्थ व्हावे. एकदा तरी असे बोलावे शब्द सारे सरुन जावे, एखादे वाक्य असे मांडावे कायमची ओळख बनावे. एखादे काव्य असे स्फुरावे अर्थपूर्ण गीत व्हावे, एखादी तान अशी घ्यावी ऐकणाऱ्याने तृप्त व्हावे. एकदा तरी असे वागावे समोरच्याने सुखी व्हावे एकदातरी असे जगावे कायमची स्मरणात उरावे.

तुझ्यासाठी...

तुझ्याचसाठी पसरली क्षितीजावरती लाली, तुझ्याचसाठी पांघरली निसर्गाने नव्हाळी. तुझ्याचसाठी आभाळी होते मेघांची दाटी, तुझ्याचसाठी धरणीमधुनी तृण जन्म घेती. तुझ्याचसाठी पहाटवेळी पक्षी गाणी गाती तुझ्याचसाठी झाडांवरती फुले फुलून येती. तुझ्याचसाठी सुगंधाची वाऱ्याला मिठी, तुझ्याचसाठी निसर्गातून ऋतू अवतरती.

एकाकी....

एकट्याने एकट्याशी बोलले पाहिजे शब्दांनीही भाव वेडे तोलले पाहिजे. कोण वेडे आहे ऐकण्या पुन्हा पुन्हा आपुलकीचे रोप येथे रोवले पाहिजे. दु:खा मध्ये रमून जाणे रोजचेच आहे आनंदाचे झाड मनात वाढले पाहिजे. स्वत: साठी जग जगते त्यात काय मोठे दुसऱ्यासाठी कधीतरी जगले पाहिजे. आपले आपले करता हात रिक्त होती दुसऱ्याच्या आनंदाने मोहरले पाहिजे. आनंदाने जगताना जपले ही पाहिजे जपण्यासाठी कधी दूर झाले पाहिजे. १९/०२/२०२२

कोण ?

दिवसरात्रीचे रहाटगाडगे कोण फिरत ठेवते, आपल्यासाठी जीवनसरिता कोण घेवून येते. सुखदु:खाचे गीत त्यातून  अविरत उमटत राहाते, आयुष्याच्या क्षितीजावरती कोण पहाट करते. तृषार्ताच्या ओंजळीमध्ये कोण अमृत देते, तृप्त करुन आयुष्याला कोण सार्थकता देते. असते थोडे,नसते थोडे भाव भक्तीचे देणे, त्याच्या मुरलीमधूनी जिवन गाणे स्फुरते.

सारे तुझेच

सारे तुझेच होते, सारे तुझेच आहे तू आहेस म्हणून  स्वप्नांचे येणे-जाणे आहे. शब्द तुझेच होते भाव तुझेच आहेत तुझ्या मुळे इथे कवितेचे व्यक्त होणे आहे. गीत तुझेच होते सूर तुझेच आहेत तुझ्याच मुळे आयुष्यात संगीताचे लेणे आहे. रुप तुझे होते रंग तुझेच आहेत तुझ्याच मुळे सदा रंगपंचमी आहे. १८/०२/२०२२

येवून गेली ती

वाऱ्याच्या झुळके सम येवून गेली ती रातराणीचा सुगंध मनात सोडून गेली ती. धुंद पावसाच्या खुणा इथे मांडून गेली ती अस्तित्वाच्या खुणा इथे उमटवून गेली ती. नव्हता केला पुन्हा भेटीचा वायदा कोणी तरी न पुसणारी अक्षरे कोरुन गेली ती. नव्हता फुलांचा बहर उमललेला जरी इथे अत्तरा सारखी सुगंधी दरवळून गेली ती . कळी सारखी उमलली, आणी फुलून गेली फुला सारखी वाऱ्यावर डोलून गेली ती. जे कधीच रुजून येणार नाही असे निसत्व असे कोरडे शुष्क बी मनात पेरुन गेली ती ऋतू सारखे उधळले सभोवताली रंग ऋतू सारखीच चार दिवस राहून गेली ती. १७/०२/२०२२

आत्मरुप

आत्म्याचा आत्म्याशी होतसे संग, आनंदात मग्न आत्माराम. सुखाच्या शोधात साधनांचे प्रस्थ, तेथे मिळतात आत्ममग्न. नको रे मना साधनांपाठी धावू उगाच कवटाळू आत्मक्लेश. प्रेम रुप देव प्रेम रुप ज्ञान, जाणून तू पाव आत्मज्ञान.

सोबत

अजूनही या घरट्यात अभंग आहेत प्रीतीचे घडे अजूनही अंगणात पडतात प्राजक्ताचे सडे. अजूनही ऋतू वसंत उमलतो माझ्या दारी अजूनही तुझ्याचसाठी चातक घेतसे भरारी. अजूनही रोज रात्री चांदण्याची पायवाट अजूनही उजळते आठवणीतील तुझी बट. अजूनही श्रावणात भरुन येती मधुघट अजूनही तुझ्याच साठी जागी राहते पहाट. अजूनही तृणांकरांना सय तुझ्या स्पर्शाची अजूनही आठवण ओली सोबतच्या वर्षाची.
पुन्हा एकदा आसवांना एक संधी देवू या मनातल्या शब्दांना डोळ्यांमध्ये वाचू या

आपले काही राहीले नाही....

कुठे काही बोलावे असे ठिकाण राहीले नाही कुठे जरा थांबावे असे मकाण राहीले नाही. आयुष्य हा अड्डा झाला राजकारणाचा  माणसाला किंमत असेल दुकान राहीले नाही. सांगोवांगीच्या गोष्टींनी भरुन गेला ग्रंथ आपला सत्य परिस्थिती ऐकणारे कान राहीले नाही. भरुन गेली कोठारे द्वेषाच्या लागवडीने कोणी आता पुर्वीसारखे सुजाण राहीले नाही. सापडले आहे जहाज भयंकराच्या वादळात योग्य मार्गावर ठेवणारे सुकाण राहीले नाही. आदर्शाची उडवणे खिल्ली नेहमीचेच झाले. सर्वांनाच प्रेरणादायी असा प्रमाण राहीले नाही. प्रत्येकाला हवी असते शांतीब्रह्माची ठेव नम्रपणे स्तब्ध व्हावे असे प्रतिष्ठान राहीले नाही.

येणार असशील तर.....

येणार असशील तर नकळत ये चांदण्याचे पाऊल घेवून ये, उशाशी ठेवलेल्या बकुळीचा धुंद सुगंध होवून ये. येणार असशील तर पावसाची संतत धारा होवून ये बटांवरुन ओघळणारा छोटासा तृप्त थेंब होवून ये. येणार असशील तर वाऱ्याची थंड झुळूक होवून ये गोड शिरशिरी अंगावरती मनावर उब पांघरुन ये. येणार असशील तर सूर्याचा नवीन किरण होवून ये अस्तित्वाला उजळत उजळत नव जीवन घेवून ये. येणार असशील तर धुक्याची ओली चादर होवून ये कुंद हवेला धुंद करत धुंद आठवणी घेवून ये. येणार असशील तर सुखाचे कोवळे पाऊल होवून ये,  सौख्यदायी जगण्या मधले सारे समाधान घेवू ये.

लताssss

   लहानपणी फुले वेचीता हे लता मंगेशकर यांनी स्वत:बद्दल लिहीलेले पुस्तक वाचलेले आठवतेय, ते पुन्हा एकदा वाचायला हवे.    मोगरा फुलला सारखे अप्रतिम संकलन त्यांच्याबद्दलच्या लेखांचे उपलब्ध आहे.     एवढं सगळं असताना आपण काही किडूकमिडूक लिहीणं म्हणजे," समोर असलेल्या अमृतात चिमूटभर साखर टाकून ते स्वत:चे म्हणून मिरवणे."

सवय की व्यसन

व्यंकटेश माडगुळकरांनी एका ठिकाणी अस्वलाबद्दल लिहीले आहे. अस्वलाला बहावाच्या शेंगा अत्यंत प्रिय,पण बहावा सारक असल्यामुळे या प्रिय गोष्टींमुळेच अप्रिय वेदनांना त्याला सामोरे जावे लागते, "आम्ही जातो आमुच्या गावा" सिनेमातील मधु आपटेंप्रमाणेच.           मग ते अस्वल निश्चय करते,बहावाकडे बघायचेही नाही,दोन-चार दिवस सरतात,निश्चय डळमळीत होवू लागतो,बहावाचे झाड हिरव्यागार शेंगा हालवत साद घालतच असते," हवास तू, हवास मज तू, हवास तू "           "आपला काय आपल्या मनावर ताबा नाही "? असा विचार करत "एकच शेंग खाऊ" असे मनाला बजावत अस्वल झाडाजवळ जाते आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या......           आपले पण त्या गोष्टीतला बहावा आणि अस्वला सारखेच होते, फेसबुक म्हणजे बहावाचे झाडे, सुंदर पोस्टनी, फोटोंनी सजलेले,हिरव्यागार वेड लावणाऱ्या शेंगा हात हलवून साद घालत असतात.           आपला निश्चय थोडावेळ टिकतो, आपण पुन्हा पुन्हा "मला व्यसन नाही लागलय,पाच मिनिटं तर बघणार" असे मनाला बजावत इथे येतो,अडकून पडतो    ...

पुन्हा पुन्हा

पुन्हा पुन्हा जोडत राहतो नशीबाला दोन हात एवढी कसली ओढ आयुष्याची. पुन्हा पुन्हा कशी पाहतो नवी स्वप्न डोळी  उठून परत सकाळी  कासाविशी. पुन्हा पुन्हा ओढून नेते अव्यक्ताची शिदोरी एवढी कसली भुक सोबतीची. पुन्हा पुन्हा वाटत राहते होईल सारे ठिक एवढा कसा विश्वास नशीबावर.

शेवटपर्यंत

शेवटपर्यंत जगाता आले कारण शेवटपर्यंत वेड्यासारखे वागता आले, जवळ काही नसताना सुद्धा कणाकणाने वाटता आले. ०२/०२/२०२२

आता......

बंद केले सडा सारवण अंगणाला आता माझे ही मन दु:खाला सरावले आता. नकोत आता वरवरचे उपचार कोणतेही तिच्या हसण्याला औषध मानणे सोडले आता. मी एकटाच लढणार दोघांच्या नशिबाशी  अंधाराचे वरदान ही माझ्याच चंद्राने दिले आता. माहीती आहे ती होती भेट शेवटची आपली मी माझा पत्ता आयुष्यालाही देणे सोडले आता. होता हातात हात जेव्हा डोळे फितूर झाले सांगण्यासाठी शब्द उसने घ्यावे लागले आता. ०१/०२/२०२२

वेगळी

ती स्वप्न वेगळी होती त्या रात्री वेगळ्या होत्या, तुझ्या माझ्या गप्पांच्या मैफिली वेगळ्या होत्या. ते गीत वेगळे होते ते सूर वेगळे होते, तुझ्या माझ्या मौनातले हुंकार वेगळे होते. तो स्पर्श वेगळा होता तो भाव वेगळा होता, तुझ्या माझ्या मनातला ओल वेगळा होता. ती भेट वेगळी होती ती ओढ वेगळी होती तुझ्या माझ्या आयुष्यातील ती सोबत वेगळी होती. ती हाक वेगळी होती ती नाराजी वेगळी होती तुझ्या माझ्या अंतरातील ती अपूर्णता वेगळी होती. २८/०१/२०२२

नियती

मेघांच्या डोळ्यांतही झड दाटून येते जेव्हा आठवण पाण्याची मनी दाटून येते लवलवणारे पाते तेव्हा आतून सुकून जाते जेव्हा धरती त्याचे अन्न आतून तोडून घेते. फुल ही त्याचे धन वाऱ्या हाती सोपवते जेव्हा झाड फुलाच काम संपवून टाकते. प्रत्येक गोष्ट नाही घडत मनासारखी नेहमी मन तेव्हा सांधा बदलून मार्ग जुळवून टाकते, प्रत्येकाचे कार्य असते नशीबाने नेमलेले नियती नावाचे कोडे गुंते सोडवून टाकते.

मुक्ती मिळू दे देवा

सजेतून तुझ्या आता मुक्ती मिळू दे आठवणीतूनच तुझ्या ही शक्ती मिळू दे. नको द्वेष माझ्या मनी जराही रूजे दे तुझ्या प्रेमातूनच जराशी भक्ती मिळू दे. कसे वागावे जगात आता तरी कळू दे तुझ्या जगण्यातून ही युक्ती कळू दे. नको आनंद आणि दु:ख उरात राहू दे आता नव्याने समंजस व्यक्ती बनू दे. नको देवा आता हे नाटकी मुखवटे तुझ्या पाऊली अभंग मुक्त मिळू दे.

संगत

पावसाच्या पावलांंनी  तू अंगणात यावे, पुन्हा एकदा वाटते शब्दात भिजून चिंब व्हावे. वाऱ्याची झुळुक होवून तू घरामध्ये शिरावे, तुझ्या सुगंधाने घराचे देवघर व्हावे. थंडगार वारा बनून तू ग्रीष्माला लोभवावे, माझ्या मनाला सोबत घेवून तू दूर देशी जावे. कोवळे ऊन बनून तू माझ्या देहाला लपेटावे सोनेरी तुझ्या किरणांसोबत मी सोनेरी पहाट व्हावे. निसर्गाचे रुप बनून माझ्या गावातच रमावे माझ्या गावानेच मग स्वर्गाचे रूप घ्यावे.

संपवून टाकूया

केव्हा तरी एकदा परत भेटूया एकमेकांच्या आठवणी परत करुया. नकोच आता घरावरले पोकळ वासे खोलवर घातलेला पाया तोडून टाकूया. फुललेले वसंत झेलले ज्या झाडाखाली ते झाडच आता एकदा उखडून फेकूया. बघितली होती किती स्वप्न चांदण्या राती ते चांदणेच आता मनातून खुडून टाकूया. चाललो ज्या पायवाटे वरुन आनंदाने ती पायवाट आता विसरुन जावूया. नसते सुटत गणित आयुष्याचे प्रतिक वेळी मांडलेला जमा खर्च पुसून टाकूया. असतात आवडणारे रंग प्रत्येकाचे वेगळे एकमेकांत मिसळण्या आधीच धुवून टाकूया. लिहीली प्रत्येक कविता तुझ्या प्रेमाखातर ती वही एकदा तुझ्या साक्षीने जाळून टाकूया.

चारोळी- बेत

मना प्रमाणे जगण्याचे किती बेत होते, मी शोधत आत होतो मन दुसऱ्याच्या ताब्यात होते.      *सुप्रभात*

देवा रे

देवा तुझ्या डोईवर माझ्या स्वप्नांचे ओझे आणि तुझा उंबरा माझ्या पायाने गजबजे. देवा तुझ्या पाठीमागे माझ्या मागण्यांचे लोंढे आणि तुझी पायवाट सोडून मी मार्ग शोधे. देवा तुला नावाला माझ्या नावाचा रे बट्टा आणि तुझ्या देवळात लागे मागण्यांचा सट्टा देवा माझ्या आर्जवाने तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आणि माझ्या सुकृतांचा शेवटी माझा मीच धनी.

अशीच....

अशीच होती कविता लिहीली अशीच होती शब्द वेंधळी, अशीच होती तुही समोरी अशीच होती वेळ हळवी. अशीच होती पहाटवेळ अशीच होती थंडी गुलाबी अशीच होती उब तनूवर अशीच होती लाज लाजरी. अशीच होती मान फिरवली अशीच लाली गोबऱ्या गाली अशीच होता स्पर्श आर्जवी अशीच होती फुले उमलली. असेच होते मौन आपले असेच होते हरवून जाणे असेच होते अंतरावर असेच होते तुझे नी माझे असेच होते तुटत जाणे असेच होते अबोल बघणे असेच होते शोधत राहणे असेच होते जगत जाणे.

संपून जाणे

फुललो मी नेहमीच जेथे निर्माल्य होवून गेलो देवा तुझ्या डोईवरचा भार मातीमध्ये मिसळून गेलो. सुगंधाची लयलूट केली देव्हाराही सजवून गेलो, तुझ्या पासून तुटताना भुईला सुगंध वाटून गेलो. विझणाऱ्या वातीसारखा हवेमध्ये विरुन गेलो, देह सार्थकी होता होता तुझ्या नावे उरुन गेलो. फुलांचही माणसा सारखे आयुष्य कोणासाठी संपते, दोन दिसांनी नवीन फुलते जूने माती होवून जाते

याला काही अर्थ नाही

संपल्यावर सारे काही कोणी हात पुढे करते तेव्हा लक्षात येते याला काही अर्थ नाही. धावून थकलेल्या पावलांना कोणी नवा मार्ग दाखवते तेव्हा लक्षात येते याला काही अर्थ नाही. स्वप्न संपल्या डोळ्यांशी जेव्हा कोणी डोळे मिळवते तेव्हा लक्षात येते याला काही अर्थ नाही. विरुन गेलेल्या आठवणींना कोणी दुरून साद घालते तेव्हा लक्षात येते  याला काही अर्थ नाही. निर्मल्य झालेल्या फुलाला कोणी डोई माळू पाहते तेव्हा लक्षात येते याला काही अर्थ नाही. वठलेल्या कल्पवक्षा कोणी नव्याने जगवू पाहते तेव्हा लक्षात येते याला काही अर्थ नाही. माती झालेल्या माणसाला कोणी पुन्हा पुन्हा स्मरते तेव्हा लक्षात येते याला काही अर्थ नाही.

मकरसंक्रांत

काकू, तिळगुळ घ्या गोड बोला. मला माहितीय मेल्या, भयंकरणीकडे आधी गेला असशील नंतर माझी मेलीची आठवण काढली असशील. आज्जीच्या परवानगीशिवाय मी कधी काही करतो का काकू ? तिळगुळ पण तिच्या सल्ल्यानेच केला असशील? हो तर,गुळ चिरायला पण आधी तिचाच सल्ला घेतला . तुला पाडायला म्हणायचं आहे का?. जिवंत रहायचयं काकू मला पुढच्या संक्रांतीपर्यंत. माझ्या मनात असलेल्या छोट्या छोट्या तिळांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी गोड शब्दांचा गुळ घालायचा प्रयत्न केलाय काकू,आपले गोड शब्दसुद्धा काहीजणांना तिरकस टोमणे वाटतात🥲. आधी बोलत जावं ! बाबा,समोरच्याला गुड, कडू वाटेल हे त्यांच्या त्या त्या वेळच्या मनस्थितीवर अवलंबून असते आणि हो, आपण सिग्धपणे माणसं जोडत गोडवा जपायचे काम करत रहायचे, आपल्या हातात तर तेवढेच असते. नमस्कार करतो काकू. बरं वाटलं रे बोलून, नाहीतर "२०० मेसेज पाठवण्यापेक्षा दोन गोड शब्द बोलून बघा" हे ही मेसेजमध्येच सांगायचे दिवस आलेयत हो.             दोन गोड शब्द  कानावर यावे, दोन गोड क्षण मनात उरावे तोच हा दिन सुगीचा मकर संक्रामणाचा मनातून मनामध्ये रुजत जावयाचा. माझ्या कणाकणाने जोड...

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

           दु:ख आपले मनीमनीचे             कुपीमध्ये लपवून यावे,            तिळगुळ घेवून भेटेल त्याला            गोड शब्द वाटून द्यावे.                          असे सरावे दिवस सारे             असेच सगळे वर्ष सरावे,              संक्रांतीच्या एक दिनाचे              महत्व सारे सरुन जावे.                       मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

कविता जिवनाची

अशीच होती कविता लिहीली अशीच होती शब्द वेंधळी, अशीच होती तुही समोरी अशीच होती वेळ हळवी. अशीच होती पहाटवेळ अशीच होती थंडी गुलाबी अशीच होती उब तनूवर अशीच होती लाज लाजरी. अशीच होती मान फिरवली अशीच होती गोबऱ्या गाली अशीच होता स्पर्श आर्जवी अशीच होती फुले उमलली. असेच होते मौन आपले असेच होते हरवून जाणे असेच होते अंतरावर असेच होते तुझे नी माझे असेच होते तुटत जाणे असेच होते अबोल बघणे असेच होते शोधत राहणे असेच होते जगत जाणे.

तुझेच......

आठवणीतले माणिक मोती गळून गेले, तुझेच होते. डोळ्यामधले स्वप्न सुनहरे काजळ डोही,तुझेच होते. रंगबिरंगी दिवस तेही फुलपाखरी तुझे होते, हातामध्ये शिल्लक उरले रंग सगळे तुझेच होते. स्निग्ध उबेचे स्पर्श सावळे रेंगाळणारे तुझेच होते. उंबऱ्यावरला पायरव ते चाहूल भरले तुझेच होते. गंध वेगळे हवेत भरले वाऱ्यावरती तुझेच होते. आठवणीतच उरले सारे विरुन गेले,तुझेच होते. पाठी मागे शिल्लक आहे मी पण माझे,तुझेच होते. संपून गेले तरी ही सारे नाव त्यावरी तुझेच होते.

माझ्या कवितेचे भाग्य

माझ्या कवितेचे वेड माझ्या उरी राहू दे, माझ्या शब्दांचे कोड माझे मला सुटू दे. माझ्या गीताचा अर्थ कोणातरी उमगू दे, त्याच्या मुखातून ते स्वर होवून उमटू दे. माझ्या आर्ततेला नवे कोंदण लाभू दे कोणीतरी व्यथांचेही थोडा हिशेब मांडू दे. माझ्या काव्याची सुमने कोणा पायी पडू दे उचलून त्याने त्यांना उराउरी भेटू दे. माझ्या कविता अभंग तुझ्या डोही राहू दे नाही देवत्वाचा स्पर्श तरी वचनी उरु दे. माझ्या कवितेला गोडी अमृतासम लाभू दे, देवा तुझ्या कौतुकात माझे कवित्व संपू दे.  

कविता म्हणजे

शब्दांचा खेळ असतो आयुष्याचा मेळ असतो, कविता म्हणजे तरी काय भावनांचा कल्लोळ असतो. स्वप्नांचे प्रगट होणे आठवणींचे दाखले देणे, कविता म्हणजे तरी काय विचारांचे व्यक्त होणे. नात्यांचा मान असणे जगण्याचे भान असणे, कविता म्हणजे तरी काय जीवनाचे गाणे गाणे. सौख्याचे वाटणे असते आनंदाचे वेचणे असते, कविता म्हणजे तरी काय एकमेकांशी जोडणे असते.

साधेसुधे

साधीसुधी माणसं माझ्या कवितेचा पाया, साध्यासुध्या माणसांची साधीसुधी माया. साध्यासुध्या स्वप्नामधले साधसुधे गाव, साध्यासुध्या माणसांच्या मनाचा ठाव. साध्यासुध्या जीवनातील साधेसुधे कर्म, साध्यासुध्या माणसांच्या जगण्याचे मर्म. साध्यासुध्या जीवनाची साधीसुधी कथा, साध्यासुध्या माणसांच्या जीवनाची गाथा. साधेसुधे येणे आणि साधेसुधे जाणे, साध्यासुध्या आठवणींचे कणभर उरणे.

लळा जिव्हाळा

मला जो लागला तुझा लळा आहे सर्व दुनियेचा त्यावर पहारा आहे. सावली बघ गोळा झाली झाडाखाली  पांथस्थांचा जणू तो शेवटचा आसरा आहे. नभाला आस लागली मातीला भेटण्याची येतो तिच्याही अंगावर शहारा आहे. तिथे पलिकडे भेटते क्षितीज धरतीला त्याच्याही स्वप्नपूर्तीचा तोच सहारा आहे. असेच असतात रंग दुनियेचे झाकलेले इथे प्रत्येकजण आतून आवारा आहे.

आत्मपरीक्षण

           इतके सोपे असतं का कोणाला वजा करणे इतके सोपे डोळ्यातले स्वप्न पुसून टाकणे.            माणसांकडे माणूस म्हणूनच बघितलं पाहीजे, माणूस परिपूर्ण कधीच नसतो, ना मुलगा म्हणून,ना पालक म्हणून,ना साथिदार-जोडीदार म्हणून.             तो चुकत असतो,घडत असतो,बिघडतही असतो. त्याला समजून घेता आले पाहीजे, आधार देता आला पाहिजे.सावरता आलं पाहिजे.            त्याच्याकडून परिपूर्ण असण्याची अपेक्षा करण्याआधी आपल्या आत डोकवता आलं पाहीजे.            स्वत:च्या मनाला जपण्याआधी दुसऱ्याचे मन समजून घेता आलं पाहिजे.             अलिप्ततेचा बुरखा पांघरता पा़ंघरता आपण रुक्षतेकडे तर वाटचाल करत नाही आहोत, हे डोळसपणे बघता आले पाहिजे.

चाहूल

तुझी चाहूल लागावा मन व्याकूळ व्हावे तुझ्या पाऊलखुणांवरुन मन मागे मागे जावे          असे हल्ली नेहमीच का व्हावे ?

ऋतू

ऋतू पांघरुन घेताना सृष्टी बदलत असते, पुन्हा बहरुन येण्यासाठी आधी रिक्त होवून जाते.

वसंत आपला स्वत:चा

फुलपाखराच्या आयुष्यात वसंत एकदाच येतो पण कोशातून बाहेर येतानाच फुलांचे रंग पंखांवर देतो. माणसांच्या आयुष्यातही वसंत एकदाच येतो पण वेदनेच्या कोशातून रंगीत शब्दांना जन्म देतो.

मैत्री फेसबुक शाळेतील

          दोन दिवस आपल्या फ्रेंडलिस्ट बद्दल लिहीलेले दिसतेय, सगळीच गंमतीदार निरिक्षण. ते वाचून मला एका जपानी हायकूचे मराठी चारोळी रुपांतर आठवले.        आपण दोघे गप्पा मारु        ये माझ्या जवळी        तु ही वेडा, मी ही वेडा        ही वेड्यांची शाळा.                        मला तर ही वेड्यांची शाळाच वाटते, ना.घ.देशपांडे यांना एका कवितेत," सकाळचा उगवतीचा सूर्य लालबुंद बर्फाच्या थंडगार गोळ्यासारखा वाटतो, माणसांकडे बघता बघता तो तप्त गोळा होवून तो माथ्यावर येतो."           "त्यांना ते बघून शाळात जाणारी मुलं डोळ्यासमोर येतात, शाळेत जाणारी मुलं अज्ञाधारक,शांत, समजूतदार असतात पण शाळेत पोचली की बरोबरीच्या मुलांसोबत वांडपणा करतात".             तसेच इथेही, या वर्गात येताना बहुतेक सर्वच जण समंजस, मनमिळाऊ असतात पण इथे आल्यावर वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये विभागली जातात.     ...